80च्या दशकातील प्रसिद्ध चित्रपट अभिनेते राजकिरण महताना गेल्या 25 वर्षांपासून बेपत्ता आहेत. राजकिरण यांची मुलगी ऋषिका महतानी शहा दरवर्षी तिच्या वडिलांच्या वाढदिवशी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देते. राजकिरण यांना ऋषिका आणि मन्नत महतानी अशा दोन मुली आहेत. त्यांची पत्नी रूपा हिने दुसरा विवाहदेखील केला आहे. माध्यमातील वृत्तानुसार, गेल्या 25 वर्षांपासून राजकिरण यांचा ठावठिकाणा नाही.
बॉलिवूड स्टार्सशी संबंधित अनेक किस्से तुम्ही ऐकले आणि वाचले असतील, पण आज आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत, त्यांच्याविषयी जाणून तुम्ही थक्क व्हाल. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या कर्ज या चित्रपटातून देशभरात प्रसिद्ध झालेले आणि 80 च्या दशकातील हिरो राजकिरण महतानी गेल्या 25 वर्षांपासून बेपत्ता आहेत.
माध्यमातील वृत्तानुसार, गेल्या 25 वर्षांपासून राजकिरण यांचा ठावठिकाणा कोणालाही माहीत नाही. त्यांचे कुटुंबीयही त्यांचा शोध घेत आहेत, मात्र आजतागायत त्यांच्याबद्दल कोणालाच माहिती मिळालेली नाही. राज यांना ऋषिका आणि मन्नत महतानी अशा दोन मुली आहेत. त्यांची पत्नी रुपाने दुसरे लग्न केले आहे. राज यांची मुलगी ऋषिका व्यवसायाने ज्वेलरी डिझायनर आहे. ती दरवर्षी वडिलांना तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते.
या पोस्टमध्ये ती तिच्या वडिलांसोबतचा एक फोटो प्रत्येकवेळी शेअर करते. हा फोटो तिच्या लहानपणीचा आहे. या फोटोत गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केलेली ऋषिका तिचे वडील राजकिरण यांच्या मांडीवर बसलेली दिसते. वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ती नेहमी याच फोटोचा वापर करते. राज किरण यांची फिल्मी कारकीर्द चांगली सुरू असताना, त्यांनी मुख्य भूमिकांशिवाय सहायक अभिनेता म्हणून अनेक भूमिका साकारल्या. परंतु, त्यांचं असे अचानक गायब होणं त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता.
काही माध्यम वृत्तांमधील दाव्यानुसार, राजकिरण त्यांच्या फिल्मी कारकिर्दीत पिछाडीवर गेले आणि या गोष्टीचा त्यांच्या मनावर परिणाम झाला. त्यामुळे ते नैराश्यात गेले. नंतर त्यांना मुंबईतील भायखळा येथील मनोरुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे ते फिल्म इंडस्ट्रीतून गायब झाले. अनेक वर्षांपासून ते अमेरिकेत एकांतवासात राहत होते, असं सांगितलं जातं. जून 2011 मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना अभिनेते ऋषी कपूर यांनी राज यांचा भाऊ गोविंद महतानींना फोन केला. त्यावेळी राजकिरण अटलांटा येथील मनोरुग्णालयात असून, मानसिक आजारामुळे त्यांना तिथं ठेवण्यात आल्याचं त्यांनी ऋषी कपूर यांना सांगितलं.
2011 मध्ये राजकिरण यांची मुलगी ऋषिकाने एक सार्वजनिक निवेदन जारी करून राजकिरण अटलांटामध्ये सापडल्याच्या वृत्ताचं खंडन केलं. मी आणि माझे कुटुंबीय न्यूयॉर्क पोलीस, खासगी गुप्तहेरांच्या मदतीनं त्यांचा अनेक वर्षांपासून शोध घेत आहोत, असं ऋषिकाने स्पष्ट केलं होतं. कागज की नाव (1975), शिक्षा (1979), मान अभिमान (1980), और एक नया रिश्ता (19880, कर्ज (1980), बसेरा (1981), अर्थ (1982), राजतिलक (1984) आणि वारिस (1988) यांसारख्या चित्रपटांमधील राजकिरण यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.