

इंदूर, 16 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपूर्वी जाम गेट येथे 1000 फूट खोल दरीमध्ये पडून महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेत नवा खुलासा झाला आहे. पती व मुलासोबत ही महिला जाम गेट येथे आली होती. येथे घाटाजवळ सेल्फी घेत असताना महिलेचा पाय सरकला आणि ती 1000 फूट खोल दरीत पडली.


या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी यामागे तिच्या पतीचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कुटुंबीयांनी असा दावा केला आहे की, पतीनेच त्यांच्या मुलीला धक्का देऊन दरीत ढकलले.


या प्रकरणात मृत महिलेच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये पतीच्या प्रेयसीदेखील असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात मृत महिलेच्या पतीविरोधात लवकुश विहार, सुखलियामध्ये मंडलेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


काही दिवसांपूर्वी महिला आपल्या पती व मुलासह जाम गेट येथे फिरायला आली होती. यावेळी घाट भागात सेल्फी घेत असताना तिचा पाय घसरुन मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते. याबाबत त्यावेळी मंडलेश्वर ठाण्याचे प्रभारी संतोष सिसोदिया यांनी सांगितले की, 28 वर्षीय महिला नीतू ही इंदूर येथील राहणारी आहे. ती पती विकास बाहेती आणि 5 वर्षीय मुलासोबत फिरायला आली होती. साधारण 11.30 वाजता गेटहून थोडं खाली घाट सेक्शनमध्ये सेल्फी घेण्यासाठी हे तिघे थांबले होते.


सेल्फी घेत असताना नीतूचा पाय सरकला आणि ती 1000 फूट खोल दरीत कोसळली. डोकं, हात-पाय आणि मानेला गंभीर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. जाम गेटचे सुरक्षारक्षक सहदेव गीरवाल याने सांगितले की, ही घटना साधारण 11.45 मिनिटांनी झाली. सूचना मिळताच पोलिसांची टीम आणि स्थानिक नागरिक डोंगरामध्ये नीतूला शोधू लागले. कालांतराने जखमी अवस्थेत नीतूचा मृतदेह सापडला.