

क्रिकेटचे मैदान गाजवणारे क्रिकेटर निवृत्तीनंतर कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात शिरकाव करतात. त्यातले बरेचजण राजकारणाच्या मैदानात उतरतात. 2019च्या लोकसभा निवडणुकीतही भारताचा माजी खेळाडू गौमत गंभीरनं राजकारणात प्रवेश केला. भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर पुर्व दिल्लीतून गंभीरला उमेदवाराही देण्यात आली. गंभीरनं 2007 टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 वर्ल्ड कपमध्ये महत्त्वाची भुमिका बजावली होती.


गौतम गंभीरच्या आधी वादग्रस्त खेळाडू श्रीसंतनही राजकारणात प्रवेश केला होता. भाजपकडून 2016 केरळ विधानसभा निवडणुकीत श्रीसंतला तिरुनवंतपुरममधून उमेदवारीही देण्यात आली होती. मात्र, या निवडणुकीत श्रीसंत हरला. त्यानंतर तो पक्षात जास्त दिसला नाही. श्रीसंतवर मॅच फिक्सिंग प्रकरणी क्रिकेटबंदी लादण्यात आली होती, मात्र बीसीसीआयनं नुकतीच ती बंदी हटवली.


भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीननं क्रिकेटच्या मैदानात भरघोस यश मिळाल्यानंतर कॉंग्रेसकडून राजकारणात प्रवेश केला. अझरुद्दीन 2009च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधून उमेदवारी देण्यात आली होती, आणि त्याला खासदारकी मिळाली. मात्र, 2014 साली मोदी लाटेमुळं अझरुद्दीनला पराभव स्विकारावा लागला. 2019मध्ये मात्र त्याला उमेदवारी देण्यात आलेली नाही.


किर्ती आजाद हे भारतानं सर्वप्रथम विश्वचषक जिंकलेल्या 1983च्या भारतीय संघातील प्रमुख खेळाडू होते. त्यानंतर कॉंग्रेसमध्ये पक्षप्रवेश करत किर्ती यांनी राजकारणात प्रवेश केला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ते झारखंडच्या धनबादमधून लढत आहेत. याआधी तीनवेळा त्यांनी विधानसभा जिंकली आहे. त्यांचे वडील झा आजाद यांनी बिहारचे मुख्यमंत्रीपद भुषवलं आहे.


मोहम्मह कैफनं 2014च्या लोकसभा निवडणुकीआधी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी उत्तरप्रदेशच्या फूलपुर येथून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, मोदींच्या लाटेमुळं कैफला पराभव स्विकारावा लागला.


विनोद कांबळीनंही क्रिकेटनंतर राजकारणात आपलं नशीब आजमावलं होतं. मात्र, त्याला राजकारणात यश आलं नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विक्रोळीतून कांबळी मैदानात उतरला होता.


नवज्योत सिंग सिद्धू हे नाव राजकारणात बहुचर्चित आहे. सिद्धू पहिल्यांदा भाजपकडून 2004मध्ये अमृतसरमधून खासदारकी मिळाली. त्यानंतर 2009मध्ये पुन्हा त्याला खासदारकी मिळाली. मात्र, 2014मध्ये भाजपनं निवडणुकीचं तिकीट त्यांना दिलं नाही. त्यांना राज्यसभेत पाठवण्यात आलं होतं. मात्र त्यांनी भाजपला चिट्टी देत 2017ला कॉंग्रसेचा हात धरला. त्यानंतर सिद्धू पंजाबकडून विधानसभेत निवडणुक आले.


मनोज प्रभाकर यांना एनडी तिवारी यांच्या ऑल इंडिया इंदिरा कॉंग्रेसनं दक्षिण दिल्लीतून लोकसभेत उतरले होते. मात्र, लोकसभेत हरल्यानंतर ते पुन्हा राजकारणात उतरले नाही.