

टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माने आज बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतकी खेळी तर केलीच सोबत एकदिवसीय सामन्यात 9000 धावांचा टप्पाही पूर्ण केला. 9000 धावा करणार रोहित हा जगातला तिसरा खेळाडू ठरला आहे. हा आकडा गाठण्यासाठी रोहितला 217 सामने खेळावे लागले.


सर्वात जलद 9000 एकदिवसीय धावा करण्याचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने 194 सामने खेळून हा पराक्रम आपल्या नावावर कोरला. त्याच्यानंतर नंबर लागतो तो एबी डिविलियर्सचा. त्याने 208 सामन्यात 9000 धावा केल्यात.


गमंतीशीर गोष्ट म्हणजे, रोहित शर्माने आपल्या करिअरची सुरुवात संथ गतीने केली. रोहितने 82 सामन्यात 2000 एकदिवशीय धावा पूर्ण केल्या होत्या. सर्वात कमी वेगाने 2000 धावा पूर्ण करणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला. पण त्यानंतर रोहितने जोरदार कमबॅक करत धावांचा पाऊस पाडला. त्यानंतर सर्वात जलद 7 हजार धावांचा टप्पा गाठला.


सर्वात जलद 3 हजार धावा करणाच्या प्रकारात रोहित हा 92 व्या क्रमांकावर होता. 4 हजार धावा करताना तो 57 क्रमांक, 5 हजार धावा करताना तो 30 व्या क्रमांकावर पोहोचला. त्यानंतर 6 हजार धावांचा टप्पा गाठत असताना रोहितने 15 व्या क्रमांकवर झेप घेतली.


7 हजार धावांचा टप्पा गाठला तेव्हा तो 5 व्या क्रमांकवर पोहोचला. सर्वात जलद त्याने 8 हजार धावांचा टप्पा गाठून तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला. आता रोहित शर्माच्या समोर 9 हजार धावांचा टप्पा होता. अखेर आज त्याने तो टप्पाही गाठला.