

ICC world cup 2019मध्ये भारतीय संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. फलंदाजी असो की गोलंदाजी किंवा मग क्षेत्ररक्षण भारतीय संघाने सर्वच पातळीवर चांगली कामगिरी केली आहे. पण एकच गोष्ट आहे जी भारतीय संघाला आणि चाहत्यांना देखील खटकत आहे आणि ती म्हणजे महेंद्रसिंग धोनीची फलंदाजी... अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात संध गतीने फलंदाजी केल्याबद्दल धोनीवर अनेकांनी टीका केली होती. भारताचे सेमीफायनलचे तिकीट जवळपास निश्चित मानले जात आहे. पण संघाला धोनीच्या कामगिरीची काळजी लागली आहे.


आज (गुरुवारी) होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघाला सेमीफायनलची जागा पक्की करता येईल. या सामन्यात सर्वांची नजर भारतीय संघाच्या कामगिरीवर असेल त्यापेक्षा अधिक लक्ष असेल ते धोनीच्या फलंदाजीवर. गेल्या काही सामन्यात संध फलंदाजी केल्यामुळे धोनी टीकेचा धनी झाला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध धोनीने 52 चेंडूत 28 धावा काढल्या होत्या. स्ट्राइक रेट आणि स्ट्राइक रोटेट करण्यात अपयशी ठरलेल्या धोनीवर खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील टीका केली होती. मधल्या षटकांमध्ये धोनी धावा करण्यात अपयशी ठरला आहे.


अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर रवी शास्त्री यांनी धोनीशी चर्चा केली होती. तसचे धोनीची तुलना विराटशी होऊ शकत नाही असे देखील ते म्हणाले होते. विराट सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये अव्वल फलंदाज आहे त्याची तुलना इतर कोणाशीही होऊ शकत नाही.


अर्थात धोनीच्या या निराश कामगिरीनंतर माजी कर्णधार सौरव गांगुलीने धोनीला एक चांगला फलंदाज असल्याचे म्हटले होते. लवकरच धोनी स्वत:ला सिद्ध करेल. त्याने फक्त एका सामन्यात खराब कामगिरी केल्याचे गांगुली म्हणाला होता.


धोनीच्या या वर्षातील कामगिरीवर नजर टाकल्यास त्याने 50पेक्षा अधिकाच्या सरासरीने 12 सामन्यात 417 धावा केल्या आहेत. ज्यात 4 अर्धशतकांचा देखील समावेश आहे. अर्थात धोनी स्ट्राइक रेट 78.88 इतका आहे. जो त्याच्या करिअरच्या स्ट्राइक रेट(87.47) पेक्षा कमी आहे.


2011मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विजेतेपद पटकावले होते. धोनीचा हा चौथी विश्वचषक स्पर्धा आहे. 2007च्या वर्ल्डकपमध्ये धोनी केवळ 29 धावा केल्या होत्या. 2011च्या स्पर्धेत 7 डावात त्याने 150 धावा केल्या होत्या. पण श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने 91 धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळेच भारताने 1983नंतर विजेतेपद मिळवले होते. 2015च्या वर्ल्डकपमध्ये ग्रुप स्टेजमध्ये सर्व सामने जिंकणारा धोनी पहिला भारतीय कर्णधार ठरला होता. झिम्बाब्वे विरुद्ध धोनीने 85 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडच्या भूमीवर भारतीय कर्णधाराची ही सर्वोत्तम खेळी आहे.