

जेव्हा आपण काही खातो किंवा पितो, तेव्हा तोंडावाटे काही प्रमाणातह हवा आपल्या पोटात जाते आणि ही हवा तोंडावाटे पुन्हा बाहेर फेकली जाते आणि त्याला ढेकर असं म्हटलं जातं.


जेवणानंतर ढेकर आली की पोट थोडं हलकं झाल्यासारखं वाटतं, एकप्रकारे समाधान मिळतं, मात्र अनेकदा आपल्याला आंबट ढेकरदेखील येतात, ज्यामुळे खूप त्रास होतो.


जनरल फिजिशिअन डॉ. प्रज्वलित सोनकांबळे यांनी सांगितलं की, जेवणानंतर लगेच ढेकर येणं ही पोट भरल्याची लक्षणं आहेत, अशी ढेकर शक्यतो 2 तासांत येते. तर आंबट ढेकर हे अपचनाचं लक्षण आहे. 2 तासांनंतर अन्नपचनाची सुरुवात झालेली असते, अशावेळी अन्न नीट पचलं नाही तर आंबट ढेकर येते


भरभर खाणे, च्युइंगम चघळणे, धूम्रपान, सोडायुक्त पेयांचं सेवन या सवयीही ढेकर येण्यास कारणीभूत ठरतात.


डॉ. संजय तळगावकर यांनी सांगितलं, पित्ताशयात खडे होणे, सूज येणे अशी समस्या उद्भवल्यास अनेकदा पित्ताशय काढलं जातं. अशा रुग्णांना सातत्याने ढेकर येण्याची समस्या उद्भवते कारण त्यांचं अन्न नीट पचत नाही, त्यामुळे अशा रुग्णांनी जास्त तेलकट खाऊ नये. पित्ताशयाची समस्या, आतड्यांचं कार्य नीट होत असेल, तर जास्त ढेकर येऊ शकतात.


वारंवार ढेकर येणं हे अॅसिड रिफ्लेक्स किंवा गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लेक्स डिसीज, अपचन, गॅसट्रायटिस, हेलिकोबॅक्टर पायलोरी, इरिटेल बाऊल सिंड्रोम या आजारांचं लक्षण आहे.