

केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील कडक्कल या छोट्याशा गावातून झेप घेवून थेट आकाशाला गवसणी घालणारा अरुण एस. नायर आज यशाच्या शिखरावर पोहचला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थांसाठी तो एक आदर्श ठरला आहे. अरुण एका छोट्याशा गावातील सरकारी शाळेतून शिक्षण घेऊन डॉक्टर झाला आणि त्यानंतर यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याचा हा प्रवास थक्क करणारा आहे. त्याने 2019 सालच्या यूपीएससी परीक्षेत देशात 55 वा क्रमांक पटकावला होता. त्याने हे यशाचे शिखर कसे सर केले ते जाणून घेऊया.


डॉ. अरुण एस. नायर हे मूळचे केरळचे आहेत. त्यांनी कोल्लम येथील सरकारी शाळेतून आपलं बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्याचबरोबर त्यांनी वैद्यकीय परीक्षेत राज्यात चौथा क्रमांक मिळवला. आणि 2017 मध्ये एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर अरुणने यूपीएससीची तयारी करण्याचे ठरवले. एका व्हिडीओ मुलाखतीत त्यांनी सांगितले की, लहानपणापासूनच त्यांना डॉक्टर बनायचे होते. पण डॉक्टर बनल्यानंतर त्याचं डॉक्टरी पेशात त्यांचे मन रमले नाही. मग त्यांनी यूपीएससीची तयारी करण्याचे ठरवले. येथे आवर्जून उल्लेख करावा तो म्हणजे, डॉ अरुणचे वडील सैन्यातील निवृत्त अधिकारी आहेत, तर आई गृहिणी आहे. अरुणची लहान बहीण अजून शिक्षण पूर्ण करीत आहे. अरुणने तिसर्या प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. वैद्यकीय अभ्यासाच्या अंतिम वर्षात असताना त्याने सर्वप्रथमच यूपीएससीची परीक्षा दिली होती. त्यानंतरच खऱ्या अर्थाने यूपीएससी करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली, असं ते स्वत: सांगतात.


तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधून एमबीबीएस पूर्ण केलेल्या अरुणने 'द हिंदू' शी बोलताना सांगितले की, मी आरोग्य सेवेत काम करत असताना सनदी सेवा करण्याची इच्छा मला खुणावत होती. त्याचवेळी मला वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याचा कंटाळा आला होता. मला आणखी काहीतरी वेगळं आणि आव्हानात्मक करायचं होतं. म्हणून मी सर्व गोष्टी सोडून थेट यूपीएससी करण्याचा निर्णय घेतला.


खेड्यात वाढलेले आणि सरकारी शाळेत शिकलेले अरुण म्हणाले की, मल्याळम माध्यमाच्या विद्यार्थ्याला जेव्हा इंग्रजी बोलण्याची वेळ येते, तेव्हा खऱ्या अर्थाने आत्मविश्वास खचतो. माझाही आत्मविश्वास सुरुवातीला कमी झाला होता. पण मी लवकरच त्यावर नियंत्रण मिळवलं.


अरुण म्हणतो की, एखाद्या व्यक्तीचे ध्येय आणि दृढनिश्चय पक्का असेल तर त्याच्या मार्गात काहीही अडथळा ठरू शकत नाही. त्यांनी डॉक्टरकी पूर्ण केल्यानंतर तिसर्या प्रयत्नात ही परीक्षा पास केली. एक किंवा दोन प्रयत्नात बरेच लोक खचून जातात. अशा परिस्थितीत अरुण समोर वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याचा पर्याय खुला होता. पण अरुण आपल्या ध्येयावर ठाम राहिला आणि तिसरा प्रयत्नही करुन पाहिला. तेव्हा हे उत्तुंग यश त्याच्या हाती लागले.


अरुण एस. नायर यांना त्यांच्या अभ्यासाच्या रणनीतीबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की मेडीकल सायन्स हाच विषय पर्याय म्हणून निवडायचा हे त्यांनी मनोमन पक्क केलं होतं. मेडीकल सायन्स पर्याय निवडण्याचा त्यांचा ठाम हेतू होता. परंतु त्यांना त्यावेळी या विषयाचे कोचींग मिळू शकले नाही. मग त्यांनी स्वतःच अभ्यास करायचा निर्णय घेतला आणि मेडीकल सायन्स सारख्या अवघड विषयाची तयारी केली. अरुणने एका मुलाखतीत सांगितले की, मी या परीक्षेचा अभ्यास कसा करायचा ? असे विचारले तेथिल शिक्षकांनी सांगितले की सर्वप्रथम अभ्यासक्रम समजून घ्यायचा आणि मगच तयारीला सुरुवात करायची. मी कमीत कमी दोन वर्षे तयारी केली. यासाठी मी शिक्षकांची, एनसीईआरटीची पुस्तके, वर्तमानपत्रे इत्यादींची मदत घेतली. या काळात बरेच चढ-उतार आले. पण मी माझे ध्येय सोडले नाही. अरुणने सांगितले की, मी कसलेही वेळापत्रक तयार केले नव्हते, किंवा विशिष्ठ वेळेत ठरवून परीक्षेची तयारी नव्हती केली. कारण माझा हार्डवर्कपेक्षा माझा स्मार्टवर्कमध्ये जास्त विश्वास आहे, असंही अरुणने सांगितले. मी कधीकधी 14 तासदेखील अभ्यास केला, तर कधीकधी दोन किंवा तीन तासही केला.