Pakistan Army: पाकिस्तानच्या सैन्यात हिंदू आणि शिखांना भर्ती केलं जातं का?
पाकिस्तानाता इतर धर्माचे लोक खूप कमी आहेत. अशात तिथे दुसऱ्या धर्माच्या लोकांची सेनेत भर्ती केली जाते का? एक काळ असा होता, जेव्हा सेनेत केवळ मुस्लिमांची भर्ती केली जात असे. मात्र, कालांतरानं हिंदू आणि शिखांनाही (Hindus and Sikhs) सेनेत भर्ती केलं जाऊ लागलं.


पाहायला गेल्यास पाकिस्तानात अल्पसंख्यांकांना प्रत्येक परिक्षेला बसण्याची परवानगी आहे. मात्र, तरीही पाकिस्तानी सैन्यात (Pakistan Army) अल्पसंख्यांक यातही विशेषतः हिंदू आणि शिखांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे.


पाकिस्तानमध्ये सुरुवातीपासून ते २००६ पर्यंत केवळ एका हिंदूला आणि एका शिखाला सैन्यात जागा दिली जात होती. तर, पाकिस्तानी सैन्यात अनेक ईसाई सैनिक होते.


२५ सप्टेंबर २००६ मध्ये PTI या न्यूज एजंसीनं ६० वर्षात पहिल्यांदा एका हिंदूला पाकिस्तानी सैन्यात भर्ती केलं गेल्याची बातमी छापली होती. या बातमीत असाही उल्लेख केला होता, की याच्या काहीच दिवस आधी एका शीख तरुणाला सैन्यात भर्ती करुन घेण्यात आलं होतं. या हिंदू युवकाचं नाव दानिश असं होतं. ते पाकिस्तानी आर्मीमध्ये कॅप्टन होते.


दानिश राजस्थानच्या सीमेवर असणाऱ्या ग्रामीण सिंधच्या थारपारकर जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं गेलं होतं. दानिशनं यावेळी सांगितलं होतं, की त्यांना सैन्यात भर्ती होण्याची प्रेरणा पाकिस्तानी राष्ट्रपती जनरल परवेद मुशर्रफ यांच्याकडून मिळाली. त्यांनी हेदेखील म्हटलं होतं, की मुशर्रफ यांच्याकडे ते सगळे गुण आहेत, जे एका महान नेत्यामध्ये असायला हवे. वरच्या फोटोमध्ये आहेत पाकच्या आर्मीमधील आणखी एक हिंदू कॅप्टन अनिल कुमार.


दिसंबर २००५ मध्ये ननकाना साहिबचे हरचरन सिंह हे पाकिस्तानच्या सेनेत भर्ती होणारे पहिले सीख होते.


पुढे २०१० मध्ये अमरजीत सिंह नावाच्या आणखी एका शिख तरुणाला पाकिस्तानी रेंजर म्हणून नियुक्ती मिळाली होती. वाघावर आपल्या परेडमुळेही ते चर्चेत आले होते. यानंतर एक शीख तरुण पाकिस्तानी कोस्ट गार्ड म्हणून भर्ती झाला होता.


याशिवाय पोलीस विभागात, गुलाबसिंग नावाच्या शीख युवकास प्रथमच ट्रॅफिक पोलिस वॉर्डन बनविण्यात आलं होतं.


यानंतर काही हिंदू आणि शीख अल्पसंख्यांकांना हळू हळू पाकिस्तानी सैन्यात स्थान मिळालं. त्यांची अचूक संख्या किंवा याबद्दल आकडा उपलब्ध नाही. मात्र, काही वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये 27 वर्षीय लान्स नाईक लालचंद रबारीचा मृत्यू झाला होता. त्यावेळी ते पीओकेजवळ मंगला फ्रंटवर तैनात होते. ते सिंधच्या बदिन जिल्ह्यातील होते.