S M L

फ्लॅशबॅक 2014 : क्रीडा विश्वासाठी 'कही खुशी, कही गम' !

Sachin Salve | Updated On: Dec 29, 2014 12:57 PM IST

फ्लॅशबॅक 2014 : क्रीडा विश्वासाठी 'कही खुशी, कही गम' !

[wzslider autoplay="true"]

2014 हे वर्ष क्रीडा विश्वासाठी 'कही खुशी कही गम' असंच राहिलं...टीम इंडियासाठी हे वर्ष कुठे निराशाजनक ठरलं तर कुठे 'हिट' ठरलं.

परदेशात झालेल्या मालिकांमध्ये टीम इंडियाचे हिरो 'झिरो' ठरले...तर तिथेच मुंबईकर रोहित शर्माने डब्बल सेंच्युरी करून नवा इतिहास रचला...एवढंच नाहीतर भारताची सुवर्णकन्या मेरी कोमने 'गोल्डन' पंच लगावला...तर तिथेच सरिता देवीवर बंदी घालण्यात आली...दुसरीकडे जीतू रायने सुवर्ण वेध घेतला...तर तिथेच अभिनव बिंद्राने आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती घेतलीये...वर्ष सरतं असताना अवघ्या क्रिकेट विश्वासाला ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन फिलीप ह्युजेसच्या अकाली निधनाची बातमी चटका लावून गेली...असंच काहीस वर्ष खेळाच्या मैदानावर आणि मैदानाबाहेरही 'कही खुशी कही गम' असंच राहिलं...याबद्दलचा हाआढावा घेण्याचा प्रयत्न....

फिलीप ह्युजेसचा मृत्यू

खेळ म्हटलं की, धोका येतोच, पण क्रिकेटमध्ये हा धोका काहीसा कमी असतो. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलीप ह्युजेसचा स्थानिक स्पर्धेत खेळताना दुर्देवी मृत्यू झाला. साऊथ ऑस्ट्रेलिया विरूद्ध न्यू साऊथ वेल्स सामन्यात फिलीप 63 धावांवर खेळत असताना वेगवान गोलंदाज ऍबॉटचा बाऊन्सर त्याच्या डोक्यावर लागला. काही कळण्याच्या आत फिलीप मैदानातच कोसळला. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कोमात गेलेल्या फिलीपने तीन दिवस मृत्यूशी झुंज दिली पण त्याचीही झुंज अपयशी ठरली...वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी या तरूण फिलीपने जगाचा निरोप घेतला. त्याच्या या निधनामुळे क्रिकेटविश्व गहिवरलं. जगभरातील खेळाडूंनी फिलीपला साश्रूनयनांनी निरोप दिला.

आता वेध 2015 च्या 'वर्ल्डकप'चे

2014 निरोप घेत असताना आता सर्वांना वेध लागले आहे ते 2015 मध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणार्‍या क्रिकेट वर्ल्डकपचे. वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाची न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील कामगिरी निराशाजनकच झाली. न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिकेत 1-0 आणि एकदिवसीय मालिकेत 4-0 ने भारताला पराभूत व्हावे लागेल. इंग्लंडमध्ये भारताने कसोटी मालिका 3-1 ने गमावली. पण एकदिवसीय मालिकेत भारताने इंग्लंडला धूळ चारत 24 वर्षांनी दिमाखदार मालिका विजय मिळवला. विशेष म्हणजे वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमच्या संभाव्य 30 खेळाडूंची यादी जाहीर केली गेलीये. 2011 वर्ल्ड कप विजयातील 5 महत्वाच्या सीनिअर खेळाडूंना यावेळी डच्चू दिला गेला आहे. वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, गौतम गंभीर, हरभजन सिंग आणि झहीर खान यांना या संभाव्य 30 जणांच्या टीममध्ये स्थान मिळू शकलेले नाही आहे. 2011 च्या वर्ल्ड कप विजयात युवराज सिंगनं सिंहाचा वाटा उचलला होता तर सेहवाग आणि गंभीरच्या बॅटिंगच्या जोरावर आणि हरभजन आणि झहीर या सीनिअर खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर टीम इंडिया फायनलपर्यंत पोहोचू शकली होती. पण आता या यंग टीम इंडियामध्ये सीनिअर्सना स्थान मिळू शकलं नाहीये.

रोहित शर्माने रचला इतिहास

मुंबईकर रोहित शर्मासाठी यंदाचे वर्ष चांगले ठरले. वन डे क्रिकेटच्या इतिहासात दोन वेळा डबल सेंच्युरी करण्याचा विक्रम भारताच्या रोहित शर्माने रचला. इतकंच नाही तर, फक्त 173 बॉल्समध्ये तब्बल 33 फोर आणि 9 सिक्स ठोकत रोहित शर्माने 264 रन्स करत 'वन डे क्रिकेट'च्या इतिहासात रोहितने 'सर्वाधिक धावा' करण्याचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'ही आपल्या नावे केलाय. याअगोदर 2013साली बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 158 बॉल्समध्ये रोहितने 209 रन्स ठोकले होते आणि त्यानंतर त्यानं पुन्हा एकदा डबल सेंच्युरी ठोकण्याचा पराक्रम केला आहे. रोहित शर्माने वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकरचा रेकॉर्डही मोडीत काढला. वन डे क्रिकेटच्या इतिहासात एकाच इनिंगमध्ये सर्वाधिक फोर ठोकण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही रोहितने केला आहे.

फुटबॉल वर्ल्डकप : जर्मनी ठरली वर्ल्ड चॅम्पियन

सरत्या वर्षात रंगत आणली ती ब्राझीलमध्ये रंगलेल्या फुटबॉल वर्ल्डकपने. फुटबॉलच्या पंढरी समजल्या जाणार्‍या ब्राझीलमध्ये फुटबॉलचा थरार अवघ्या जगाने 'याची देही याची डोळा' अनुभवला. मात्र यजमान ब्राझीललाच आपल्याच मायभूमीत अत्यंत लाजिरवाणा पराभवाचा सामना करावा लागला. तर जर्मनीने यंदा चमकदार कामगिरी करत फुटबॉलच्या सोनेरी चषकावर आपले नाव कोरले. फायनलमध्ये अतिरिक्त वेळेत अर्जेंटिनाचा पराभव करत जर्मनी चौथ्यांदा फुटबॉल वर्ल्ड चॅम्पियन ठरली.

भारताच्या हक्काचं 'फुटबॉल'

जगभराला वेड लावणार्‍या या फुटबॉल खेळाचा थरार यंदा भारतातही हक्काने अनुभवता आला. रिलायन्स फाऊंडेशन्सच्या चेअरमन नीता अंबानी यांच्या पुढाकाराने आयएमजी रिलायन्स आणि स्टार इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन सुपर लीगची सुरुवात करण्यात आली. या लीगमुळे देशात फुटबॉल पर्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या लीगमध्ये बॉलिवडूचे अभिनेते रणबीर कपूर, जॉन अब्राहम,अभिषेक बच्चन तसंच क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली यांनी सहभाग घेऊन चार चाँद लावले. दोन महिने चाललेल्या या फुटबॉल मेळ्याची धूम चांगलीच गाजली. या इंडियन सुपर लीगमध्ये सौरव गांगुलीच्या ऍटलेटिको कोलकातानं सचिन तेंडुलकरच्या केरला ब्लास्टर्सचा पराभव करत इंडियन सुपर लीगचं पहिलं जेतेपद पटकावलं.

मेरी कोमचा गोल्डन पंच

17 व्या एशियन गेम्समध्ये भारताची सुवर्णकन्या मेरी कोमनं बॉक्सिंगच्या महिलांच्या 51 किलो वजनी गटात गोल्ड मेडलची कमाई करत तिच्यावर असलेल्या अपेक्षांची पूर्ती केली. मेरीने फायनल मॅचमध्ये कझाकिस्तानच्या झायिना शेकेरबिकोवा हिचा 2-0 ने पराभव केला. फायनलमध्ये सुरुवातीला झायनाने आघाडी घेतली होती, मात्र मेरीने आपल्या कौशल्याने ऐतिहासिक विजय खेचून आणला. बॉक्सिंगमध्ये भारताला पहिल्यांदाच गोल्ड मेडल मिळालं आहे.

सरिता देवींवर बंदी

इन्चॉन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे सरिता देवीला सिलव्हर मेजलला मुकावं लागलं. सेमी फायनलमध्ये दक्षिण कोरियाच्या बॉक्सरविरुद्धच्या मॅचमध्ये अव्वल कामगिरी करुनही सरिता देवीला पराभूत घोषित केलं गेलं होतं. त्यामुळे सरिताने पारितोषिक वितरण समारंभात सरिताने ब्राँझ मेडल घ्यायला नकार दिला. यावेळी सरिताला अश्रू अनावर झाले. या घटनेची इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनने गंभीर दखल घेत तिच्यावर एक वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय.

जीतू रायची सुवर्ण कामगिरी

क्रिकेटमध्ये भारताची निराशाजनक कामगिरी असली तरी अन्य खेळांमध्ये भारतीयांनी चांगली कामगिरी केली. भारतीय शुटिंगकडून नेहमीच आपल्याला मोठ्या अपेक्षा असतात आणि याच अपेक्षांवर खरं उतरत जीतू रायनं यावर्षी सुवर्ण कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर 2016 मध्ये रिओमध्ये होणार्‍या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. 10 मीटर पिस्तूल प्रकार असेल किंवा 50 मीटर पिस्तूल प्रकार असेल जीतूने जागतिक स्पर्धांवर अधिराज्य गाजवत आंतरराष्ट्रीय जगतात आपला दबदबा निर्माण केला.

अभिनव पर्व संपलं

आशिया क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाज चांगली कामगिरी करत असतानाच,  नेमबाज जगतानं एका अव्वल शूटरला अलविदा केला. भारताचा एकमेव ऑलिम्पिक गोल्ड विजेता अभिनव बिंद्रानं आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून निवृत्ती घेतली . इंचिऑनमध्ये आशिया क्रीडा स्पर्धा ही त्याची शेवटची स्पर्धा ठरली. या स्पर्धेत अभिनवनं दोन मेडल्सची कमाई केली. पण त्याला ब्राँझ मेडलवरच समाधान मानावं लागलंय.  कॉमनवेल्थ आणि वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये सुवर्णवेध घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलं एक दशक त्यानं आपला दबदबा कायम राखला होता. पण एशियन गेम्समध्ये अभिनवला गोल्ड मेडलनं हुलकावणी दिली. अभिनवच्या निवृत्तीमुळे भारतीय नेमबाद जगतातील एक पर्व संपलंय.

सानिया मिर्झासाठी हे वर्ष स्वप्नवत

भारतीय टेनिसची पोस्टर गर्ल सानिया मिर्झासाठी 2014 चं वर्ष खर्‍या अर्थानं स्वप्नवत राहिलं. डबल्स आणि मिक्स डबल्समध्ये कमालीची कामगिरी करणार्‍या सानियानं ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये आपली छाप उमटवली. यूएस ओपनच्या मिक्स डबल्सचं जेतेपद आणि सगळ्यात प्रतिष्ठीत अशा WTA वर्ल्ड टूअर फायनल्सचं डबल्सचं जेतेपदही खिशात घालून तिने धडाकेबाज कामगिरीचा सिलसिला सुरूच ठेवला.

सायना आणि श्रीकांतनं घडवला इतिहास

बॅडमिंटनमध्ये चिनी खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळतो. पण चीनसमोर यंदाच्या वर्षी भारतीय बॅडमिंटनपटूंनी आव्हान निर्माण करुन बॅडमिंटनमधील चीनच्या मक्तेदारीला सुरुंग लावला. चायना ओपनसारखी सुपर सीरिज जिंकत सायना आणि श्रीकांतनं इतिहास घडवला. तर वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सलग दुसर्‍यावर्षी ब्राँझ मेडल पटकावत सिंधूनं जागतिक पातळीवर आपलं महत्व सिद्ध केलं. ग्लास्गो कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल पटकावत परुपल्ली कश्यपने दक्षिण आशियाच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे. पण बुद्धिबळामध्ये भारताच्या विश्वनाथन आनंदला पुन्हा एकदा विजयाने पाठ फिरवली आणि भारतीय क्रीडाप्रेमींची निराशा केली.

सचिन तेंडुलकरचं आत्मचरित्र

2014 चे वर्ष सरत असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आत्मचरित्राचं प्रकाशन झालं. आपल्या आयुष्याचा प्रवास सचिननं या पुस्तकातून जगाच्या समोर मांडला आहे. 'प्लेईंग इट माय वे' या आत्मचरित्रातून सचिनने 24 वर्षांतील आपले अविस्मरणीय अनुभव शेअर केले आहेत. या आत्मचरित्रात असेही काही प्रसंग सचिनने लिहिलेत ज्यावरुन खळबळ उडालीये. सचिनच्या आयुष्यातील आत्तापर्यंत न सांगितलेल्या आणि न बाहेर आलेल्या अनेक गोष्टी या पुस्तकात लिहिल्या आहेत. त्यामुळे ,सचिनच्या या आत्मचरित्राची 150,000 प्रतींचा प्रकाशना पूर्वीच खप झाला होता.

जयपूर पिंक पँथर्स प्रो कबड्डी लीग चॅम्पियन

मुंबईत झालेल्या पहिल्या प्रो कबड्डी लीगमध्ये अभिषेक बच्चनच्या पिंक पँथर्स टीमचा विजय झाला. फायनलमध्ये पिंक पँथर्सने 35-24ने यू मुम्बाचा पराभव केला आहे. अतिशय नियोजनबद्ध खेळ करणार्‍या जयपूर पिंक पँथरने पिछाडीमुळे अस्थिर झालेल्या यू मुम्बाचा पराभव करून पहिल्यावहिल्या प्रो-कबड्डीचे विजेतेपद पटकावलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 24, 2014 09:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close