S M L

फ्लॅशबॅक 2014 : गायब झालेल्या विमानाची गोष्ट !

Samruddha Bhambure | Updated On: Dec 23, 2014 09:28 PM IST

फ्लॅशबॅक 2014 : गायब झालेल्या विमानाची गोष्ट !

[wzslider autoplay="true"]

तब्बल 239 प्रवाशांना घेऊन उड्डाण करणारं भलंमोठं विमान अचानक आकाशातून गायब होतं... 16 दिवस अवघं जग त्याचा शोध घेतो पण काहीच थांगपत्ता लागत नाही... विमानाचा आणि प्रवाशांचाही... त्या विमानाला समुद्राने गिळलं की आभाळात हरवलं... हे गूढ अजूनही कायम आहे... मलेशियन विमानाच्या बेपत्ता होण्याच्या घटनेनंतर जगभरात ठिकठिकाणी विमान दुर्घटनेची मालिकाच सुरू झाली. वेगवेगळ्या विमान दुर्घटनेत 500हून अधिक लोकांचा यात बळी गेला...सरतं वर्ष या कटू आणि रहस्यमय घटनांनी व्यापून गेलंय...त्याचाच हा आढावा घेण्याचा प्रयत्न...

सरतं वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक अशा घटनांनी गाजलं. पण हे वर्ष विमान दुर्घटनेचं ठरलं. मलेशियन एअरलाईन्सचं बेपत्ता विमान, युक्रेनमध्ये विमानावर क्षेपणास्त्र हल्ला, तैवानमध्ये विमान दुर्घटना, अल्जेरियाच्या विमानाला अपघात या घटनेत 500हून अधिक लोकांचा बळी गेलाय. त्यातल्या त्यात मलेशियन विमानाचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. मलेशियन एअरलाईन्सचं 'एमएच 370' हे बोईंग 777 श्रेणीचं विमान 239 प्रवाशांना घेऊन क्वालालंपूरहून बीजिंगकडे निघालं होतं. पण अचानक हे विमान रडारवरून नाहीसं झालं. विमान कुठे गेलं? समुद्रात पडलं, दहशतवाद्यांनी अपहरण केलं?, पायलटने पळवून नेलं हेच नाहीतर ऐलियनने गायब केलं अशा अनेक शंका-कुशंकांना पेव फुटला होता. तब्बल 26 देश या बेपत्ता विमानाचा शोध घेत होते. अमेरिका, रशिया आणि चीनच्या उपग्रह (सॅटेलाईट)ने विमानाचा शोध घेतला. कुठे या विमानाचे अवशेष सापडल्याचा दावा करण्यात आला तर कुठे अफगाणिस्तानच्या खाडीत विमान उतरलं असंही दाखवण्यात आलं. पण हे सगळं शक्यतेतच ठरलं पण हाती काही लागलं नाही. मलेशियन विमानाची शोधमोहीम आणि प्रवाशांचं काय झालं हा प्रश्न कायम राहिला. 16 दिवस चाललेल्या या शोधमोहिमेनंतर हे विमान हिंदी महासागरात बुडालं असं जाहीर करावं लागलं. पण अजूनही या विमानाचे अवशेष सापडू शकले नाहीत ना प्रवाशांचं काय झालं हे कळू शकलं नाही. त्यामुळे विमानाचं रहस्य अजूनही कायम आहे.

मलेशियाचं विमान बेपत्ता होण्याची घटना घडल्यानंतर जणू विमानाच्या मागे शुक्लकाष्ठचं लागलं होतं. जुलै महिन्यात युक्रेनजवळ रशियाच्या सीमारेषेवर मलेशियन एअरलाईन्सचं 298 प्रवाशांचं विमान मिसाईल हल्ल्यात पाडण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. रशियावादी बंडखोरांनी हे विमान पाडल्याचं स्पष्ट झालं. या विमानातील सर्व प्रवासी ठार झाले. एवढंच नाहीतर कित्येक जणांचे मृतदेहही सापडले नाहीत.

 मलेशियन विमानावर का आणि कुणी केला हल्ला?

युक्रेनजवळ 298 प्रवाशांचं विमान मिसाईल हल्ला करून पाडण्यात आलं. या विमानातील सगळेच्या सगळे 298 प्रवासी मृत्युमुखी पडले. यात 173 डच नागरिक तर 44 मलेशियन नागरिक होते. पण या विमानावर हल्ला का आणि कुणी केला, हा प्रश्न अवघ्या जगाला पडलाय.

 कोणी केला हल्ला?

- 33,000 फुटांवरून उडणार्‍या जेट विमानाला पाडू शकतील अशी मोजकीच मिसाईल्स आहेत.

- जमिनीवरून आकाशात हल्ला करणारं बक मिसाईल तब्बल 49,000 हजारांवरच्या टार्गेटचा वेध घेऊ शकतं.

- तज्ज्ञांच्या मते एखादं सुसज्ज लष्करच इतक्या उंचीवर वेध घेऊ शकतं.

- तज्ज्ञांनुसार बंडखोर वापरत असलेली खांद्यावरून लाँच करता येणारी मिसाईल्स जास्तीत जास्त 15,000 फुटांवर पोहोचू शकतात.

- रशियन आणि युक्रेनियन ही दोन्ही लष्करं बक मिसाईल्सचा वापर करतात.

यांना SA-11 नाव देण्यात आलं आहे.

- युक्रेनियन लष्कर वापरत असलेलं S-200 मिसाईल किंवा रशियन्स वापरत असलेले S-300 किंवा S-400 मिसाईल्स वापरण्यात आल्याचीही शक्यता आहे.

- अमेरिकन रिपोर्ट : विमान कोसळण्याच्या आधीच हे जमिनीवरून आकाशात हल्ला करणार्‍या मिसाईल सिस्टीमची रडारवर नोंद झाली होती.

- अमेरिकन रिपोर्ट : विमानावर हे मिसाईल आदळल्यानंतर वाढलेल्या तापमानाची नोंद रडारवर झाली.

ही घटना ताजी असताना तैवानमध्ये 116 प्रवाशांचं विमान कोसळलं. या अपघातात सर्व 116 प्रवासी ठार झाले. त्यापाठोपाठ तैवानमध्येच एशिया एअरवेजचं एक विमान कोसळलं. यात 51 जणांचा मृत्यू झाला. वेगवेगळ्या विमान अपघातात 500हून अधिक लोकांचा यात बळी गेला. अवाढव्य अशा विमान अपघाताची मालिका अवघ्या जगाला हादरवून सोडणारी आणि तितकीच रहस्यमयही ठरली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 21, 2014 05:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close