आर्थिक मंदीत नोटबंदी करून मोदी सरकारने आगीत तेल ओतलंय- यशवंत सिन्हा

आर्थिक मंदीत नोटबंदी करून केंद्र सरकारने आगीत तेल ओतण्याचं काम केलंय, अशा कठोर शब्दात यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक नितीवर कोरडे ओढलेत.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Sep 27, 2017 01:41 PM IST

आर्थिक मंदीत नोटबंदी करून मोदी सरकारने आगीत तेल ओतलंय- यशवंत सिन्हा

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : दिवसेंदिवस ढासळत चाललेल्या देशाच्या आर्थिक स्थितीवर भाजपमधून पहिल्यांदाच सरकारविरोधी सूर उमटलाय. वाजपेयींच्या काळात देशाचे अर्थमंत्री राहिलेल्या यशवंत सिन्हांनी प्रथमच मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केलीय. आर्थिक मंदीत नोटबंदी करून केंद्र सरकारने आगीत तेल ओतण्याचं काम केलंय, अशा कठोर शब्दात यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक नितीवर कोरडे ओढलेत.

एका इंग्रजी वृत्तपत्रात देशाच्या आर्थिक सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करणारा लेख त्यांनी लिहिलाय. या लेखाद्वारे त्यांनी देशाचे विद्यमान अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

यशवंत सिन्हा लिहितात, ''पंतप्रधान दावा करतात की, त्यांनी अत्यंत जवळून गरिबी पाहिली आहे. त्याचवेळी, देशातील प्रत्येक नागरिकाने गरिबी जवळून पाहावी, यासाठी त्यांचेच अर्थमंत्री दिवस-रात्र मेहनत करतायेत, अशी जळजळीत टीका यशवंत सिन्हा यांनी अरुण जेटलींवर केली आहे. शिवाय, अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेची जी अवस्था करुन ठेवलीय, त्यावर मी आता बोललो नाही, तर ते माझ्या देशाप्रती असलेल्या कर्तव्याशी धोका केल्यासारखं होईल. मला माहिती आहे, मी जे बोलतोय त्याच्याशी भाजपचे अनेक लोक सहमत होतील. मात्र भीतीमुळे ते बोलत नाहीत.''

देशाच्या खासगी गुंतवणुकीत मोठी घसरण झाली असून गेल्या दोन दशकातली ही निच्चांकी गुंतवणूक असल्याचं यशवंत सिन्हा यांनी म्हटलंय. औद्योगिक उत्पन्नाची स्थिती बिकट आहे, कृषी क्षेत्रातही समस्या वाढल्यात, रोजगार उपलब्ध करणारे उद्योगधंदेही संकटात आहेत. नोटाबंदी पूर्णपणे अपयशी ठरलेली असतानाच सरकारने जीएसटी लागू केल्याने व्यापाऱ्यांमध्ये भयावह स्थिती आहे. लाखो लोक बेरोजगार होत असल्याचं सिन्हा या लेखात लिहितात.

विकास दरातील घसरणीबाबतही यशवंत सिन्हांनी थेट अरुण जेटलींवर निशाणा साधला आहे. 'पहिल्या तिमाहीत विकास दर घसरुन 5.7 टक्के झाला. गेल्या तीन वर्षातील ही सर्वात मोठी घसरण आहे. तरीही सरकारचे प्रवक्ते म्हणतात की, नोटाबंदीमुळे मंदी आली नाही. त्यांचं बरोबर आहे. कारण मंदीची सुरुवात ही याआधीच झाली होती. नोटाबंदीने केवळ आगीत तेल ओतण्याचं काम केलं गेलं आहे, असंही यशवंत सिन्हा यांनी लेखात म्हटले आहे.

Loading...

वाजपेयींच्या काळात देशाचे अर्थमंत्रीपद यशस्वीपणे सांभाळलेले यशवंत सिन्हा हे माजी आयएएस अधिकारीही आहेत. यांचे पुत्र जयंत सिन्हा हे सध्याच्या मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत. तरीही त्यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर थेटपणे टीका केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2017 01:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...