मोदी आणि शहांचे विश्वासपात्र कोण आहेत जे.पी नड्डा?

आणखी काही महिने अमित शहा हेच अध्यक्षपदी कायम राहणार असले तरी त्यांच्या तालमीत नड्डा यांचं आता ट्रेनिंग होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 08:40 PM IST

मोदी आणि शहांचे विश्वासपात्र कोण आहेत जे.पी नड्डा?

नवी दिल्ली, 17 जून : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात झाला. त्यामुळेच अमित शहा यांच्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण याची चर्चा सुरू झाली होती. यामध्ये माजी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचं नाव आघाडीवर होतं. अपेक्षेप्रमाणे नड्डा यांची भाजपच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आलीय. आणखी काही महिने अमित शहा हेच अध्यक्षपदी कायम राहणार असले तरी त्यांच्या तालमीत नड्डा यांचं आता ट्रेनिंग होणार आहे.

भाजपचे रणनीतीकार

भाजपचे हे 59 वर्षांचे नेते आणि राज्यसभेचे खासदार जे. पी. नड्डा पक्षाची रणनीती ठरवणारे महत्त्वाचे नेते आहेत. ते भाजपच्या संसदीय मंडळाचे सचिव आहेत. या लोकसभा निवडणुकीत जे. पी. नड्डा यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी होती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने इथे जोरदार यश मिळवलं. उत्तर प्रदेशच्या 80 जागांपैकी भाजपला इथे 62 जागा मिळाल्या.

जे. पी. नड्डा यांचा मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश केला गेलेला नाही. त्यामुळेच त्यांच्या खांद्यावर भाजपच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली जाईल, अशी शक्यता होती..अमित शहा यांचा विश्वास

जे. पी. नड्डा हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विश्वासातले मानले जातात. अगदी कठीण प्रश्न सोप्या पद्धतीने सोडवण्यात त्यांची ख्याती आहे. जे. पी. नड्डा हे मोदी आणि अमित शहा यांच्यासोबतच भाजपच्या शक्तिशाली त्रिमूर्तींमध्ये एक आहेत.

जेपी आंदोलन ते अभाविप

जे. पी. नड्डा हे हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर जिल्ह्यातले. त्यांचा जन्म पाटण्यामध्ये 2 डिसेंबर 1960 ला झाला. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनामुळे प्रभावित होऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला. बिहारमधल्या विद्यार्थी आंदोलनात त्यांनी हिरीरीने भाग घेतला. त्यानंतर ते अभाविपमध्ये आले.

1977 मध्ये पाटणा विद्यापीठात विद्यार्थी सेनेच्या निवडणुकीत ते सचिव म्हणून निवडून आले आणि 13 वर्षं विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रिय राहिले.

जे. पी. नड्डा यांचं संघटनकौशल्य बघून त्यांना 1982 मध्ये हिमाचल प्रदेशच्या विद्यार्थी परिषदेचे प्रचारक बनवण्यात आलं. याचवेळी त्यांनी हिमाचल प्रदेश विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली हिमाचल प्रदेश विद्यापीठात पहिल्यांदा विद्यार्थी सेनेची निवडणूक झाली आणि अभाविपला यात यश मिळालं. 1983 च्या सुमाराला जे. पी. नड्डा हे हिमाचल प्रदेश विद्यापीठात विद्यार्थी परिषदेचे पहिले अध्यक्ष झाले आणि 1986 पासून 1989 पर्यंत ते विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महासचिव होते.

राष्ट्रीय संघर्ष मोर्चा

जे. पी. नड्डा यांनी 1989 मध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध राष्ट्रीय संघर्ष मोर्चाची बांधणी केली आणि केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केलं. 1991 मध्ये 31 वर्षांचे जे. पी. नड्डा हे भाजयुमोचे अध्यक्ष बनले. 1993 मध्ये हिमाचल विधानसभा निवडणुकांमध्ये विलासपूरचे आमदार म्हणून निवडून येत ते विधानसभेत पोहोचले. त्यावेळी त्यांना विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून निवडलं गेलं. हिमाचल प्रदेश सरकारमध्ये त्यांनी आरोग्य, पर्यावरण, विज्ञान तंत्रज्ञान अशी मंत्रिपदं भूषवली आहेत.

राज्यसभेत निवड

2012 मध्ये जे. पी. नड्डा राज्यसभेत निवडून आले आणि त्यांना संसदीय समित्यांमध्ये स्थान मिळालं. नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष असताना ते राष्ट्रीय महासचिव आणि प्रवक्तेही होते.

उत्कृष्ट स्विमर

जे. पी. नड्डा हे उत्कृष्ट जलतरणपटू आहेत. त्यांनी ऑल इंडिया ज्युनिअर स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये बिहारचं नेतृत्वही केलं होतं. चर्चेत राहणं पसंत न करता जे. पी. नड्डा हे त्यांच्या कामामधून त्यांची चुणूक दाखवत असतात. त्यामुळेच त्यांच्यावर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाईल, अशी शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2019 08:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...