नामांतराच्या मुद्द्यावरुन चर्चेत असलेले औरंगाबादचा काय आहे इतिहास? आफ्रिकी गुलामाने केली होती मदत

नामांतराच्या मुद्द्यावरुन चर्चेत असलेले औरंगाबादचा काय आहे इतिहास? आफ्रिकी गुलामाने केली होती मदत

हे शहर वसवण्यात महत्त्वाची भूमिका एका आफ्रिकी गुलामापासून सैन्य अधिकारी झालेल्या व्यक्तीची होती.

  • Share this:

मुंबई, 5 जानेवारी : महाराष्ट्रातील मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या मागणीला पुन्हा एकदा जोर चढला आहे. औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली असल्यानेच पुन्हा नामांतराच्या विषयाला हवा दिली जात आहे. नामांतरासाठी सरकारने नियुक्त केलेल्या समितीने नामांतराचा निर्णय घेतल्यास हा बदल होईल.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘संभाजीनगर हे नाव सर्वांनाच मान्य आहे. आगामी निवडणुकीत महापालिकेत भाजपची सत्ता आली तर आपण लगेच नामांतर करू. ’ सध्या पालिकेत आणि राज्यात शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेना अनेक वर्षांपासून नामांतरणाचा मुद्दा मांडून निवडणुका जिंकत आली आहे. काँग्रेसने नामांतराला कायमच विरोध केला आहे. आता शिवसेना आणि काँग्रेस सत्तेत असल्यामुळे पाटील यांनी सेनेला चिमटा काढत नामांतराची तयारी दर्शवली आहे.

शिवसेनेनी जून 1995 मध्ये पहिल्यांदा औरंगाबाद महानगरपालिकेत नामांतराचा प्रस्ताव मांडला होता आणि पासही करून घेतला होता पण काँग्रेसच्या नगरसेवकाने त्याला विरोध करत पहिल्यांदा उच्च आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. औरंगाबादेत नामांतर झालं तर आपल्या मुस्लीम व्होटबँकेला धक्का लागेल अशी भीती काँग्रेसच्या मनात असल्याने त्यांनी नामांतराला विरोध केला आहे. मुस्लिमांना ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमिन (AIMIM) पक्षाचा आधार वाटत असल्यानेही काँग्रेस भयभीत झाली आहे. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात असणाऱ्या या शहराला मुघल बादशहा औरंगजेबाचं नाव देण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्म बदलण्यास नकार दिल्यामुळे त्यांचे अतोनात हाल करून औरंगजेबाने 1689 मध्ये त्यांची हत्या केली होती. औरंगजेब याचा मृत्यु 1707 मध्ये झाल्यानंतर औरंगाबादजवळच खुल्ताबादेत त्याची कबर बांधण्यात आली. इस्लामचा कट्टर समर्थक आणि मुघलांमधला शेवटचा शक्तिशाली बादशहा अशी ओळख असलेल्या औरंगजेबाच्या नावावरून औरंगाबाद हे नाव शहराला मिळालं. त्यामुळे दास्याची निशाणी बाजूला करून छत्रपती संभाजी महाराजांचं नाव या शहराला द्यावं अशी मागणी केली जात आहे.

यापेक्षाही हे शहर वसवण्यात महत्त्वाची भूमिका एका आफ्रिकी गुलामापासून सैन्य अधिकारी झालेल्या व्यक्तीची होती. तो होता मलिक अंबर. तरुण वयात गुलाम विकत घेणाऱ्या अनेकांकडून त्याची खरेदी विक्री केली गेली त्यामुळे त्याचं नशीब त्याला इथिओपियातून भारतात घेऊन आलं. भारतात येऊन हा गुलाम केवळ स्वतंत्रच झाला नाही तर त्यानी समाजातील उच्च स्थान प्राप्त केलं आपलं सैन्यदल उभारलं, मोठी संपत्ती जमवली आणि एक शहरही वसवलं जे आज औरंगाबाद या नावानी ओळखलं जातं, असं इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत म्हटलं आहे. 1610 मध्ये मुघलांना अहमदनगरमधून हाकलल्यानंतर मलिक अंबरने नव्या राजधानीचं शहर खिर्की वसवलं तेच आजचं औरंगाबाद. या शहराची लोकसंख्या होती अंदाजे 2 लाख. त्यात मराठेही होते त्यामुळेच या परिसरातील छोट्या भागांची नावं मालपुरा, खेलपुरा, पारसपुरा आणि विठापुरा पडली.

लाइव्हमिंटसाठी द आयव्हरी थ्रोन्स सदर लिहिणाऱ्या मनू एस. पिल्लई यांनी लिहिलंय, ‘1610-11 ला मलिक अंबरने खिर्की हे गाव त्याचा मुख्य तळ बनवला. त्यामुळे या गावाला हळूहळू बाजारपेठेचं शहराचं स्वरूप आलं. मग त्याचे मांडलिक असलेल्या मराठा सरदारांनीही या गावात वाडे उभारायला सुरुवात केली. अंबरने सर्वांत पहिल्यांदा केलेल्या सुधारणांमध्ये जलसंधारण आणि जमिनीखालून कालवे काढण्याचं विकास काम प्रमुख होतं. नंतर दखन्नातील इतर शहरांतही अशी कामं झाली. विजापुराचं उदाहरण आपल्यासमोर आहेच. विजापुरातील इमारती उभारण्यासाठीही इंजिनीअरिंगमधील नैपुण्य आणि नियोजनाची प्रचंड गरज होती.’

मलिक अंबरच्या मुलाने फतेह खानने सत्तेवर आल्यावर शहराचं नाव फतेहनगर केलं. नंतरच्या युद्धात अहमदनगरच्या पातशहासोबतच फतेहनगर पण मुघलांकडे गेलं. आणि 17 व्या शतकात औरंगजेबाच्या राज्यात शहराचं नाव औरंगाबाद झालं. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत पिल्लई म्हणाले, ‘ खरं विचार करायचा तर हे शहर वसवण्याचं श्रेय मलिक अंबरला जातं.’ दरम्यान, सध्या नामांतराच्या मुद्द्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते हवा देत असून त्यासाठी आंदोलन छेडत आहेत. त्यांनी नुकतीच नाशिकात निदर्शनं केली. महाविकास आघाडी सरकारने 26 जानेवारीपूर्वी औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं अशी मागणी त्यांनी केली.

Published by: Meenal Gangurde
First published: January 5, 2021, 11:45 PM IST

ताज्या बातम्या