सगळ्यांनाच 'युती' हवी आहे, मग घोडं अडलं कुठे?

सगळ्यांनाच 'युती' हवी आहे, मग घोडं अडलं कुठे?

व्यक्तिगत हेवेदावे, प्रतिष्ठा, मानपान आणि वर्चस्वाचं राजकारण यात युतीचं घोडं अडलं आहे. हा पेच लवकर सुटला तर घोडा सुसाट धावेल नाही तर त्याचाच 'प्रसाद' मिळण्याची जास्त शक्यता आहे.

  • Share this:

पटक देंगे, आम्हीच मोठे भाऊ, आम्ही लाचार नाही, नाही तर एकट्यानेच लढणार या भाजप-शिवसेनेच्या आरोप-प्रत्यारोप आणि घोषणांचं कुणालाच आता अप्रुप राहिलं नाही. जाहीरपणे भांडायचं आणि पडद्यामागून 'युती'साठी प्रयत्न करायचे हे आता स्पष्ट झालंय. तरीही युतीचं अजुन काही निश्चित नाही. फक्त युतीचा पोपट जिवंत आहे हे दिसावं एवढी काळजी मात्र दोन्ही पक्षांचे नेते घेत असतात.

गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि भाजपने आपापल्या खासदारांच्या बैठका घेऊन स्थितीचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत सर्वच खासदारांनी युती करावी असं मत मांडलं. कारण युती झाली नाही तर मतविभाजनाचा फटका बसणार याचा अंदाज त्यांना आला आहे. शिवसेना आणि भाजप स्वबळाचा नारा देत असले तरी खासदारांना मात्र पराभवाची भीती वाटतेय ही वस्तुस्थिती आहे.

2014 नंतर परिस्थिती खूप बदलली आहे. भाजप विरोधात सर्वच विरोधी पक्ष एकत्र येत असल्याने भाजपलाही धास्ती वाटू लागली आहे. त्यामुळे शिवसेनेने सोबत यावं असा आग्रह भाजपचा आहे. तर शिवसेनेनं फारशी उत्सुकता न दाखवता निर्णयाचं गुढ वाढवलं आहे.

2014 मध्ये झालेल्या अपमानाचा बदला घेण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या ऐतिहसिक विजयानंतर भाजपने विधानसभा निवडणुकीत जास्त जागांची मागणी केली. शिवसेनेने नकार दिल्यानंतर 25 वर्षांची युती तुटली. नंतर राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. ताकद वाढल्याने तीन दशकं कायम नमतं घेणाऱ्या भाजपने आता आम्हीच मोठा भाऊ असल्याचं सांगत पूर्वीचा युतीचा फॉर्मुला चालणार नाही असं शिवसेनेला सांगितलंय.

2019मध्ये भाजपला स्वबळावर सत्ता मिळणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे प्रत्येक जागा भाजपसाठी महत्त्वाची आहे. उत्तर प्रदेशात 2014 मध्ये भाजपला 70 जागा मिळाल्या होत्या. सपा-बसपा युतीमुळे त्या जागांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या जागा भरून काढण्यासाठी महाराष्ट्र महत्त्वाचा आहे.

युती झाली नाही तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो. तीच अवस्था शिवसेनेचीही आहे. शिवसेनेने कितीही गर्जना केल्या तरी भाजपची ताकद वाढली हे पचवणं त्यांना जड जातंय. आणि युती झाली नाही तर शिवसेनेचं खासदारांच आताचं संख्याबळ टिकवणंही त्यांना जड जाणार आहे.

पण शेवटपर्यंत ताणून धरत भाजपवरचा दबाव वाढवायचा आणि जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या ही शिवसेनेची व्ह्युरचना आहे. गेली चाडेचार वर्ष सत्तेत राहून शिवसेनेनं सत्तेतले सर्व फायदे घेतले आहेत. त्यामुळे निवडणुकीत स्वबळावर सामोरे गेलेच तर लोक त्यांना प्रश्न विचारल्याशीवाय राहणार नाही. भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले तर निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा आघाडीला मिळू शकतो.

युतीच फायद्याची आहे हे शिवसेनेलाही कळतं मात्र 'धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं' अशी त्यांची अवस्था झाली आहे. तर 2014 नंतरचा माज न दाखवता थोड नमतं घेत शिवसेनेला काही जागा जास्त देण्याची भाजपची तयारी आहे.

व्यक्तिगत हेवेदावे, प्रतिष्ठा, मानपान आणि वर्चस्वाचं राजकारण यात युतीचं घोडं अडलं आहे. हा पेच लवकर सुटला तर घोडा सुसाट धावेल नाही तर त्याचाच 'प्रसाद' मिळण्याची जास्त शक्यता आहे.

First published: January 31, 2019, 7:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading