अर्ध्या राज्याचा पारा 10च्या खाली; नागपुरात विक्रमी थंडी

अर्ध्या राज्याचा पारा 10च्या खाली; नागपुरात विक्रमी थंडी

राज्यातील 15 हून अधिक जिल्ह्यातलं किमान तापमान 10 अंशाखाली गेल्यामुळे हाडं गोठवणाऱ्या थंडीचा अनुभव नागरिकांना येत आहे.

  • Share this:

मुंबई, 28 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे आणखी काही दिवस हा असाच जोर कायम राहिल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. शनिवारी राज्यातील 15 हून अधिक जिल्ह्यातलं किमान तापमान 10 अंशाखाली गेल्यामुळे हाडं गोठवणाऱ्या थंडीचा अनुभव नागरिकांनी घेतला. महाबळेश्व, नागपूर, नाशिक, मनमाड, परभणी, पुणे, औरंगाबाद, नांदेडसह अनेक ठिकाणी किमान तापमान 10 अंशाखाली नोंदलं गेलं.

मुंबईत तशी फारशी थंडी अनुभवयाला मिळत नसली तरी पारा घसरल्यामुळे मुंबईकरांच्या घामाच्या धारा थांबल्या आहेत. आणखी काही दिवस मुंबईकरांना ही थंडी अनुभवता येणारा आहे. मुंबई आज 20 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असली तरी अर्ध्या राज्याचा पारा 10 अंशाखाली आला होता. शनिवारी सर्वात कमी तापमानाची नोंद धुळे येथे 2.2 अंश सेल्सियस अशी झाली. नागपुरात इतिहासातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली. पुण्यातही गेल्या १० वर्षातल्या निचांकी तापमानाची नोंद झाली.

धुळे 2.2 अंश सेल्सियस 

धुळे शहरात या हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. धुळे शहरात तापमानाचा पारा तब्बल 2.2 अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेला होता. धुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका गेल्या पंधरवड्यापासून कायम आहे. तापमानाचा पारा खाली येत असल्याने याचा विपरीत परिणाम हा जनजीवनावर दिसून येत आहे. पिकांना या थंडीचा फायदा होत असला तरी सामान्यांना मात्र या थंडीने जगणं मुश्किल केला आहे. 1991 नंतर धुळे जिल्ह्याचा पारा इतका खाली आला.

नागपुरात विक्रमी थंडी; पुणंही गारठलं

नागपूर येथे इतिहासातलं सर्वात निचांकी तापमानाची नोंद शनिवारी झाली. नागपूरचा पारा 3.5 अंशापर्यंत खाली आला होता. यापूर्वी जानेवारी 2016 मध्ये 3.9 अंश तापमानाची नोंद झाली होती. पुण्यातही गेल्या १० वर्षातल्या निचांकी तापमानाची नोंद झाली. पुण्यात 5.9 अंश तापमानाची नोंद झाली. मनमाडमध्ये पारा अजूनही घसरलेलाच असून, शनिवारी 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दोन दिवसांपूर्वी निफाडचं किमान तापमान 1 अंशापर्यंत खाली आलं होतं. त्यात सुधारणा होऊन आज तापमान 4 अंश सेल्सियस नोंदलं गेलं. या थंडीचा फटका द्राक्ष बागांसह इतर अनेक पिकाना बसत आहे. थंडीमुळं जनजीवन विस्कळीत झालं असून, उघड्यावर राहणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

महाबळेश्वर परत गोठलं; दवबिंदूंचे झाले हिमकण

महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. प्रसिद्ध वेण्णालेक आणि लिंगमळा परिसरात दवबिंदूंचं हिमकणांमध्ये रूपांतर झाल्याचं पहावयास मिळत आहे. वेण्णालेक जेट्टीसह वाहनांच्या टपांवर, दुचाकींच्या सीट, हिरवळीवर, पाना-फुलांवर आणि स्ट्रॉबेरीच्या रोपांवर हिमकण जमा झाल्याचं सद्या येथे पहावयास मिळत आहे. याच महिन्यामध्ये पंधरा दिवसांपूर्वी अशाचप्रकारे दवबिंदूंचे हिमकणांमध्ये रूपांतर झाल्याचे पहावयास मिळाले होते. महाबळेश्वरचं पार परत एकदा खाली आला असून, महाबळेश्‍वरध्ये हिमकण जमा होण्याची याच महिन्यातील ही दुसरी घटना आहे. महाबळेश्वर नगरी सध्या नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाली असून, सलग आलेल्या सुट्टयांमुळे पर्यटकांची चांगलीच गर्दी येथे पहावयास मिळत आहे.

जवळपास अर्ध राज्यावर हाडं गोठवणाऱ्या थंडीनं ताबा घेतला असून, पारा आणखी खाली घसरणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. शनिवारी पुणे 5.9, जळवाग 6.0, मालेगाव 5.4, नाशिक 5.1, सातारा 9.1, उस्मानाबाद 9.1, औरंगाबाद 5.8, परभणी 6.4, नांदेड 7.5, अकोला 5.9, अमरावती 9.6, बुलडाणा 7.8, ब्रह्मपुरी 7.0, चंद्रपूर 9.0, गोंदिया 6.०, नागपूर 3.5, वाशिम 8.6, वर्धी 8.4 तर यवतमाळ येथे 9.0 अंश किमान तापमानाची नोदं झाली.

का वाढतेय थंडी?

- उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मुंबईतील तापमानात घट झाल्याचे सांगण्यात येतं आहे

- नाशिकमध्ये आतापर्यंत सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली असून पुढील 3-4 दिवसात नाशिकसह अहमदनगर आणि जळगाव या ठिकाणीदेखील वातावरण थंड राहिल.

- मुंबईतील बहुतांश भागात सुरू असलेले बांधकाम आणि रस्ता खोदकामांमुळे मुंबईतील काही भागात गेल्या आठवड्यात प्रदूषणाने उचांक गाठला.

- राजधानी दिल्लीच्या तुलनेत मुंबई शहराला मोठा सागरी किनारा लाभल्यामुळे मुंबईत वारे मोठ्या प्रमाणात वाहत असतात. परिणामी मुंबई शहरातील प्रदुषण दिल्लीप्रमाणे जास्त वेळ टिकत नाही.

 VIDEO : महाबळेश्वर परत गोठलं; दवबिंदूंचे झाले हिमकण

First published: December 29, 2018, 8:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading