'आम्ही तुम्हाला घरं दिलीत, अन्न दिलं आणि तुम्ही मोदींना मतं देता?'

'आम्ही तुम्हाला घरं दिलीत, अन्न दिलं आणि तुम्ही मोदींना मतं देता?'

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनीही पराभवाचा राग लोकांवर काढला.

  • Share this:

बंगळुरू 27 जून :  कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या वादात सापडले आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून हे नेते अजुनही सावरलेले नाहीत. एका कार्यक्रमात बोलताना सिद्धरामय्या यांनी आपला राग लोकांवरच काढला. आम्ही तुम्हाला घरं दिलीत, अन्नासाठी रेशनची व्यवस्था केली, समाज भवन बांधलं असं असताना तुम्ही लोक नरेंद्र मोदींना मतं देताच कशी असा सवाल त्यांनी लोकांना केला.

कर्नाटकातही सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या होत्या. तर काँग्रेस आणि जेडीएसला सपाटून मार खावा लागला. विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या मात्र बहुमत मिळालं नव्हतं. नंतर अनेक नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेस आणि जेडीएसने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं होतं. याआधी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनीही एका तरुणालाही हाच सवाल केला होता.

काय म्हणाले कुमारस्वामी?

तुम्ही नरेंद्र मोदींना मत दिली आणि आता तुमचे काम मी करावे अशी इच्छा आहे. तुमची अशी अपेक्षा आहे का की मी तुमचा आदर करावा? अशा शब्दात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी निवेदन देण्यास आलेल्या लोकांचा अपमान केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी रायचूर येथे एका कार्यक्रमासाठी गेले असता येरमरूस थर्मल पॉवर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांवर ते भडकले.

नेमकं काय झालं?

येरमरूस थर्मल पॉवर स्टेशनमधील कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार होते. कुमारस्वामी यांना भेटण्यासाठी त्यांनी रास्ता रोको केला. या रास्ता रोकोमुळे मुख्यमंत्री भडकले आणि त्यांनी मोदींना मतदान केले आणि माझ्याकडून काम करून घेताय अशा शब्दात त्यांना सुनावले. मी तुमचा आदर का करू, तुम्ही निघा येथून नाही तर मला लाठीचार्ज करावा लागेल, अशा शब्दात निवेदन देण्यास आलेल्या कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी हकलले.

मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण...

यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी मी 15 दिवसांचा वेळ मागितला होता. पण त्यांनी रास्ता रोको केला यामुळे राग आल्याचे ते म्हणाले. जर पंतप्रधान मोदींचा ताफा रोखला तर ते मान्य असेल का अशा प्रश्न देखील त्यांनी विचारला. राज्यातील सरकार सहिष्णु आहे पण असक्षम नाही. सरकारला माहिती आहे परिस्थितीशी कसे दोन हात करायचे, असे कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले.

भाजपने केली टीका

निवेदन देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीची वागणूक दिल्याबद्दल भाजपने मुख्यमंत्र्यांवर टीका केली. कुमारस्वामी यांनी कर्मचाऱ्यांची माफी मागावी अशी मागणी भाजपचे प्रवक्ते एन.रवी कुमार यांनी केली. मुख्यमंत्री हे राज्यातील 6.5 कोटी लोकांचे आहेत ना की केवळ जेडीएस आणि काही आमदारांचे नाहीत, असे ही कुमार म्हणाले.

First published: June 27, 2019, 4:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading