वर्षभरातल्या पाण्याचं नियोजन करून दुष्काळावर मात करणारं हे आहे आदर्श गाव!

वर्षभरातल्या पाण्याचं नियोजन करून दुष्काळावर मात करणारं हे आहे आदर्श गाव!

आदर्श व्यवस्थापन आणि लोकांच्या मदतीनं या गावानं पाणी टंचाईवर तोडगा काढला असून पुढच्या पावसाळ्यापर्यंतच्या पाण्याचं उत्तम नियोजन केलंय.

  • Share this:

साहेबराव कोकणे, अहमदनगर, ता.13 नोव्हेंबर : जेमतेम 300 ते साडेतीनशे पर्जन्यमानाच्या पट्ट्यातल्या आदर्श गाव हिवरे बाजारलाही यंदाच्या दुष्काळाचा फटका बसलाय. पण या गावानं उपलब्ध पाण्यावर वर्षभरातल्या पिकांचं उत्तम नियोजन गेल्या महिन्यातच करून ठेवलंय. त्यांच्या पाण्याच्या ताळेबंदाचा आदर्श महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावानं घेण्यासारखा आहे.

नगर जिल्ह्यातलं हिवरे बाजार हे महाराष्ट्रातलं आदर्श गाव. हिवरे बाजार पॅटर्न हा सर्व देशभर राबवला जातो. मात्र अपुऱ्या पावसामुळं या गावालाही आता पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. मात्र आदर्श व्यवस्थापन आणि लोकांच्या मदतीनं या गावानं पाणी टंचाईवर तोडगा काढला असून पुढच्या पावसाळ्यापर्यंतच्या पाण्याचं उत्तम नियोजन केलंय.

अवघ्या 3 वर्षानंतर महाराष्ट्रात पुन्हा आलेलं दुष्काळाचं संकट हे भूगर्भातली पाणीपातळी पुन्हा खोलवर नेण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. यावर हिवरे बाजार गावानं अनोखा तोडगा काढलाय. गावानं गेल्या महिन्यातच ग्रामसभा घेऊन यंदाच्या वर्षात 6 कोटी लिटर पाणीबचतीचा अनोखा संकल्प केल्याची माहिती हिवरे बाजार पॅटर्नचे जनक पोपटराव पवार यांनी दिलीय.

हिवरे बाजार गावात गेल्या दोन दशकांपासून दरवर्षी पाण्याचा ताळेबंद मांडला जातो. यामध्ये गावातला प्रत्येक घटक आपला सहभाग नोंदवतो. ऑक्टोबर महिन्यातल्या भूगर्भातल्या पाणीपातळीवरुन वर्षभरात कोणती पीकं घ्यायची ते ठरवलं जातं. यंदा गावात भाजीपाला आणि बागायती पिकं घ्यायचं नाही, केवळ उभी फळबागायती जगवण्याचा निर्णय झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिलीय.

हिवरे बाजार गावातल्या महिला स्वयंपाकघरात आणि घरकामात लागणारं पाणीदेखील वाचवतात. त्याचा पुनर्वापर फळं पिकांसाठी केला जातो. पाण्यासारख्या अनमोल स्त्रोताचा वापर दुष्काळी भागानं कसा करावा याचं उत्तम उदाहरण हिवरे बाजारनं घालून दिलंय.

नवरात्रीत झालेल्या हिवरे बाजारच्या ग्रामसभेत यंदा भूगर्भातल्या पाण्याचा हिशोब मांडण्यात आला. त्यानुसार किती क्षेत्रावरील फळपिकं जगवायची, चाऱ्याची पिकं किती ठेवायची हे गावानं एकमुखानं ठरवलं. असं नियोजन आणि अशी एकवाक्यता ठेवण्यासाठी महाराष्ट्रातल्या हजारो पाणीदार गावांनी पुढं येण्याची गरज आहे. त्यामुळं या दुष्काळातही हिवरे बाजारला दुसरीकडून पाणी आणावं लागत नाही.

VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल!

First published: November 14, 2018, 10:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading