• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • लग्नसमारंभाच्या खरेदीसाठी गेल्यानंतर भीषण अपघात; वडील आणि मुलीचा मृत्यू, नवरी जखमी

लग्नसमारंभाच्या खरेदीसाठी गेल्यानंतर भीषण अपघात; वडील आणि मुलीचा मृत्यू, नवरी जखमी

Washim Accident : ही घटना नागपूर - औरंगाबाद या महामार्गावर (Nagpur Aurangabad Highway) वाशिम जिल्ह्यातील पिंप्री नजीक रात्रीच्या दरम्यान घडली.

  • Share this:
वाशिम, 28 मार्च : कारला भरधाव कंटेनरने जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात (Accident) वडील आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. घरातील लग्न समारंभ अवघ्या काही दिवसांवर आल्याने नवरीला लागणारे कपडे आणि इतर साहित्य खरेदी करून शेंदुर्जना इथं घरी परत जात असताना नवरीचे काका आणि चुलत बहिणीचा अपघातानंतर जागीच मृत्यू झाल्याची ही घटना नागपूर - औरंगाबाद या महामार्गावर (Nagpur Aurangabad Highway) वाशिम जिल्ह्यातील पिंप्री नजीक रात्रीच्या दरम्यान घडली. .या अपघातात नवरीसह इतर 5 जण जखमी झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या शेंदुर्जना येथील दिनकर एकनाथ शिंगणे हे त्यांच्या भावाची मुलगी शिवकन्या अशोक शिंगणे हिचे लग्न ठरल्याने अमरावती येथे कुटुंबीयांसमवेत लग्नाचा बसता आणि इतर लग्न उपयोगी साहित्य घेण्यासाठी गेले होते. अमरावती येथून घरी परत जात असताना शनिवारी रात्री वाशिम जिल्ह्यातील नागपूर - औरंगाबाद या महामार्गावर पिंप्री सरहद नजीक त्यांच्या एम एच 11 सी डब्ल्यू 0436 या कारला मेहकरकडून येणाऱ्या भरधाव कंटेनर एम एच 17 बी व्ही 6489 ने समोरासमोर धडक दिली. हेही वाचा - 'सर मी पहिला आलो आहे'; आरोपीने कोर्टात दाखवला रिझल्ट, न्यायाधीशांनी खटलाच केला बंद या भीषण अपघातात दिनकर एकनाथ शिंगणे ( वय 44 ) आणि कल्याणी दिनकर शिंगणे ( वय 18 ) या दोघा बाप-लेकीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात नवरी शिवकन्या अशोक शिंगणे हिच्यासह तिचे वडील अशोक एकनाथ शिंगणे,नंदकिशोर शिंगणे, ज्ञानेश्वर शिंगणे,धनंजय शिंगणे आणि कार चालक योगेश बबन ईधारे हे जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांना मिळताच त्यांनी अपघातामधील जखमींना जवळच्या डोणगांव येथील खाजगी रुग्णालयात भरती केलं. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील वानखेडे यांच्यासह पोलीस जमादार राजू वानखेडे, कर्मचारी गणेश कोकाटे व इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन अपघाताचा पंचनामा केला. अपघातात मृत पावलेले वडील दिनकर शिंगणे आणि मुलगी कल्याणी शिंगणे यांचे शवविच्छेदन मालेगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. यावेळी उपस्थितांचे डोळेही पाणावले होते. अपघातामधील नवरी आणि इतर जखमींवर डोणगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Published by:Akshay Shitole
First published: