शिर्डी, 18 जून : घराची भिंत अंगावर कोसळून दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. घराचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने भिंत कोसळून पाच वर्षीय दोन मुलींचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर इथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. बेलापूर गावातील बोंबले वस्तीवर ही हृदयद्रावक घटना घडली आहे. वस्तीवर राहणारे बाळासाहेब गांगुर्डे यांच्या घराचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाच वर्षीय ॠतूजा बाळासाहेब गांगुर्डे आणि श्रृतीका बाळासाहेब गायकवाड या दोघी संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान खेळत होत्या.
त्याचवेळी डबर खाली करण्यासाठी आलेल्या ट्रॅक्टरचा धक्का घराच्या भिंतीला लागल्याने भिंत अंगावर कोसळून दोघीही भिंतीखाली दबल्या गेल्या. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघींनाही भितींखालून काढण्यात आले. जखमी झालेल्या श्रृतीका आणि ॠतूजा या दोघींनाही श्रीरामपूर इथल्या साखर कामगार हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.
पण दोघींचाही मृत्यू झाल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. या घटनेमुळे बेलापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी संबंधित ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पोलिसांनी दोन्ही मुलींचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. एकाच वेळी दोन कुटुंबातील चिमुकल्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे तर त्यांच्या अशा जाण्यामुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
संपादन - रेणुका धायबर