राहुरी, 13 मार्च : अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील इयत्ता पहिल्याच्या विद्यार्थ्यानं कमालचं केली आहे. त्याने उजळणीला देखील मागं टाकलं आहे. कारण उजळीत केवळ 30 पर्यंत पाढे लिहिलेले असतात मात्र या विद्यार्थ्याचे चक्क 55 पर्यंत पाढे पाठ केले आहेत. या नवयुगातला आइन्स्टाइनचं नाव विराज विवेकानंद खामकर (Viraj Vivekanand Khamkar) असं असून तो जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे. त्यांच्या या कामगिरीनं त्याने केवळ गावातच नव्हे तर राज्यात नावलौकिक मिळवला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील त्याचं कौतुक केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विराज विवेकानंद खामकर या विद्यार्थ्यानं 55 पर्यंतचे पाढे पाठ केले आहेत. तो राहुरीजवळच्या तुळापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहे. अभ्यासाची आवड असली की शाळा कोणती आहे, याला अर्थ उरत नाही, हे विराजने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. त्याने आपल्या पाठांतराने राज्यस्तरीय अंकनाद स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे. केवळ इयत्ता पहिलीत असून त्याचे 55 पर्यंतचे पाढे तोंडपाठ असल्यानं अनेकांनी त्याच्या बौधिक क्षमतेचं कौतुक केलं आहे. तसेच राज्याच्या मंत्रालयातही त्याचा सत्कार करण्यात आला आहे.
दैनिक पुढारीने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र राज्य सरकार आणि मॅप एपिक प्रायव्हेट कम्युनिकेशन, पुणे या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत विराजने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. यानंतर मुंबई येथे मंत्रालयात संबंधित स्पर्धेच्या बक्षिस वितरणाचा सोहळा पार पडला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड सोबतच अनेक मान्यवर उपस्थितीत होते. या कार्यक्रमांनंतर वर्षा गायकवाड यांनी आपल्या निवासस्थानी विजेत्यांचा सत्कार केला. यावेळी विराजने जुन्या काळातील पावकी, निमकी देखील वाचून दाखवली आहे.
हे ही वाचा - Success Story: चहा विकणाऱ्याचा मुलगा झाला IAS अधिकारी
विराजच्या या यशाबद्दल राज्यातच नव्हे, तर परदेशातूनही कौतुक केलं जात आहे. अमेरिकेतील ग्लोबल नगरी फाऊंडेशनचे सचिव रोहित काळे यांनी विराजचं कौतुक केलं आहे. याशिवाय त्यांनी अमेरिकेतून विराजसाठी बुद्धीला चालना देणारी खेळणी बक्षिस म्हणून पाठवली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Success story