नवी दिल्ली,ता.11 जून : हिंसाचारामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 2017 या वर्षात तब्बल 80 लाख कोटींचं नुकसान झाल्याचं एका सर्व्हेतून स्पष्ट झालं आहे. इंस्टिट्यूट फॉर इकोनॉमिक्स अँड पीस या आंतरराष्ट्रीय संस्थेने जगातल्या 163 देशांचा अभ्यास करून हा अहवाल तयार केलाय.
अशा हिंसक घटनांमुळे देशाच्या अर्थविकासाचा वेग मंदावतो असंही या अहवालात म्हटलं आहे. जातीय दंगली, आंदोलनं, संप, दहशतवाद आणि हिंसक उद्रेकामुळे समाजाची वीण उसवते त्याचबरोबर अर्थव्यवस्थेवरही अतिशय वाईट परिणाम होतो.
हिंसाचारामुळे उद्योगधद्यांना फटका बसतो, लोकांचा रोजगार बुडतो, उद्योगपती गुंतवणूकीस हात आखडता घेतात यामुळं अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होतो आणि अर्थव्यवस्थेचा वेग मंदावतो. भारतासारख्या विकसनशील देशाला याचा मोठा फटका बसतो. प्रतिव्यक्ती विचार केला तर हे नुकसान 40 हजार रूपये एवढं आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेलाही हिंसाचारामुळे 2017 मध्ये झालेलं नुकसान सर्वाधिक आहे. 2016 च्या तुलनेत हे नुकसान 2.1 टक्क्यांनी जास्त आहे. हिंसाचारामुळे सर्वाधिक नुकसान सीरियाला झालं असून या देशाची सर्व अर्थव्यवस्थाच कोलमडून पडली आहे. सीरिया जीडीपीच्या 68 टक्के खर्च संरक्षणावर करतो. तर अफगाणिस्तान 63 टक्के खर्च करतो.
अल सेल्वाडोर, दक्षिण सुदान, मध्य अफ्रिकेतले देश, साइप्रस, कोलंबिया, लीसोथो आणि सोमालिया हे जगातले हिंसाचारामुळे अर्थव्यवस्थेला सर्वाधिक नुकसान झालेले पहिले दहा देश आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cost, Eightylakh crore हिंसाचार, GDP, Indias, Over, Violence, अर्थव्यवस्था, जग, जीडीपी, नुकसान, भारत, विकास