अमरावती, 20 ऑक्टोबर, #VidarbhaExpressमधून दररोज विदर्भातल्या छोट्या-मोठ्या घडामोडी जाणून घेऊ या. विदर्भातल्या ११ जिल्ह्यातल्या आमच्या प्रतिनिधींनी दिलेल्या बातम्यांपैकी या महत्त्वाच्या १० :
1 - अमरावतीत वाघाने केली शेतकऱ्याची शिकार
सायंकाळी शेतात गेलेल्या एका शेतकऱ्याची वाघाने शिकार केलीय. ही घटना धामणगाव तालुक्यातील मंगरूळ दस्तगिर येथे शुक्रवारी रात्री 10.30 च्या सुमारास घडली. राजेंद्र देविदास निमकर (४८) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे, अशी माहिती आमचे अमरावतीचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी दिली आहे.
2 - अमरावती जिल्ह्यात 'स्वाभिमानी'चा चक्काजाम, कार्यकर्त्यांना अटक
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी जिल्ह्यातील देवगाव चौफुलीवर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. आंदोलनादरम्यान संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढाउ यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली धामणगाव रेल्वे इथे पार पडलेल्या दुष्काळ परिषदेत शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यात आल्या होत्या. त्या पूर्ण न झाल्यास आम्ही राज्यव्यापी चक्काजाम आंदोल करू, असा इशारा स्वाभिमानी संघटनेनं दिला होता.
3 - अकोल्यातही स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक
स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी बाळापूर-पारस फाट्यावर चक्काजाम आंदोलन केलं. जिल्ह्यात दुष्काळ घोषित करा, हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करा, सरसकट कर्जमाफीसह 7/12 कोरा करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या, असं आमचे अकोला प्रतिनिधी कुंदन जाधव कळवतात.
4 - यवतमाळ जिल्ह्यात अवैध धान्य खरेदी केंद्रावर छापे, लाखोंचा माल जप्त
प्राप्त माहितीच्या आधारे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी वणी तालुक्यातील तीन धान्य खरेदी केंद्रांवर धाड टाकली. यवतमाळचे News18लोकमतचे प्रतिनिधी भास्कर मेहेरे यांनी सांगितलं की, या कारवाईत ५० लाखांचा १५०० क्विंटल अवैध धान्य जप्त करण्यात आलेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी नांदेपेरा मार्गावर सुरू असलेली धान्य खरेदी बंद पाडली.
5 - यवतमाळ जिल्ह्यात डायरियाचं थैमान, एका छोट्या गावात ५००च्या वर रुग्ण
आर्णी नगर परिषदेंतर्गत येणाऱ्या कोळवण या अकराशे लोकवस्तीच्या वार्डामध्ये दूषित पाण्यामुळे डायरियाची लागण झाली. पाचशेहून अधिक ग्रामस्थांवर रुग्णालायत उपचार सुरू आहेत. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या लिकेज पाईपलाईनमध्ये दूषित पाणी शिरल्याने गावातील जवळपास 500 नागरिकांना डायरियाची लागण झाली आहे. यात महिला, पुरुष आणि लहान मुलांचं प्रमाण अधीक आहे.
6 - अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला राष्ट्रवादीचा मार्चा
अकोला जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून थकबाकीची रक्कम दिवाळी पूर्वी अदा करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविला. यावेळी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
7 - वाशीम जिल्ह्यात मोबाईल टॉवर ना हरकत रद्द करण्यासाठी उपोषण
रिसोडच्या एकता नगर भागात एका खाजगी मोबाईल कंपनीने टावर उभारण्यासाठी रिसोड नगरपालिकेला नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने नवीन वाद समोर आलाय. मोबाईल टॉवर उभारण्यासाठी दिलेली परवानगी रद्द करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागणी मान्य होईपर्यंत उपोषण न सोडण्याचा इशारा नागरिकांनी शनिवारी उपोषणाच्या पाचव्या दिवशी दिला, अशी माहिती मनोज जयस्वाल या आमच्या वाशिम प्रतिनिधींनी दिली आहे.
8 - वर्धेत 'स्वाभिमानी'चं धरणे आणि रास्ता रोको आंदोलन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वर्धा ते समुद्रपूर मार्गावर सेवाग्राम चौकात धरणे आंदोलन केलं. त्यानंतर अचानक रास्ता रोको करण्यात आला. मात्र हा रास्ता रोको काही मिनिटं चालला, असं वर्धा प्रतिनिधी नरेंद्र मते कळवतात. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्यासह काही कार्यकर्ते सेवाग्राम पोलिसांनी ताब्यात घेतले.
9 - वाशिम येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला चक्काजाम
संघटनेचे वाशिम जिल्हा अध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात वाशीम येथील पुसद नाक्यावर अकोला हैदराबाद महामार्गावर सरकार विरोधात घोषणाबाजी करून आज शनिवारी सकाळी 10.30 वाजता रास्तारोको करण्यात आलं. विविध मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आजचे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
10 - 'हेलपिंग हँडस'ने दिले माकडीणीला जीवदान
यवतमाळ शहरातील पाटीपुरा या भागात एक माकडीण पिलाला जन्म देत असताना अडल्याची माहिती 'एम. एच. 29 हेल्पिंग हँड्स' या ग्रुपला मिळाली. त्यावरून ग्रुपच्या काही सदस्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत माकडिणीला जीवनदान दिलं. मात्र यात तिच्या पिलाचा मृत्यू झाला.
महाराष्ट्रातल्या ताज्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लॉगऑन करा - lokmat.news18.com