मुंबई, 10 जून : उन्हामुळे घामाघूम झालेल्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुंबईसह उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. परंतु, उद्या मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे.
अरबी समुद्रात तयार होत असलेलं 'वायू' चक्रीवादळ परवा सकाळी गुजरातच्या सौराष्ट्र किनारपट्टीवर धडकणार आहे. त्याआधी अग्नेय अरबी समुद्रात आणि लक्षद्विप जवळ चक्रीवादळाची निर्मिती होतेय. या चक्रीविदळाला हवामान विभागाने वायू हे नाव दिलंय. हे वायू चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर अंतरानं वेगाने प्रवास करतंय.
म्हणजेच महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि मुंबईत या वायू चक्रीवादाळाचे परिणाम दिसतील. त्यानंतर उत्तरेला थेट गुजरातमधील सौराष्ट्रच्या किनारपट्टीला परवा सकाळी हे वायू चक्रीवादळ धडकणार आहे.
त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी सव्वाशे ते दीडशे किलोमीटरपर्यंत असणार आहे. या आपत्कालीन परीस्थितीचा सामना करण्यासाठी गुजरातमध्ये सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहे. महत्त्वाचं म्हणजे वायू चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीला थेट धोका नाही. मात्र, कोकण आणि मुंबईतल्या काही भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
========================