मुंबई, 1 जानेवारी : सतत बदलणाऱ्या निसर्गाला तोंड देत आपल्या लेकरांना उभं करण्यासाठी...संसाराचा गाडा ओढण्यासाठी घरातील प्रत्येक कर्ता पुरुष प्रयत्न करीत असतो. त्यातही काहीजण अर्ध्यातच संसार सोडतात. ग्रामीण भागात घरातील कर्त्या पुरुषाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला जे हाल सहन करावे लागते याचा आपण विचारही करू शकत नाही. त्यात कोरोनामुळे अनेक घरांमध्ये आर्थिक चणचण जाणवत आहे. मात्र आपली सर्व ताकद ऐकवटून नागरिक मेहनत करत आहे.
मनसेच्या एका फेसबुक पेजवरुन (मनसे वृत्तांत अधिकृत) (MNS facebook VIDEO) एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील वाईमधील एका गावातील चिमुरडी चेहऱ्यावर कुठलंही दु:ख न आणता कोवळ्या वयात सहन करावं लागणारा त्रास व्यक्त करीत आहे. तिची ती निरागसता पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी तरळेल. मेथीची भाजी विकणाऱ्या चिमुरडीसोबत एक महिला संवाद साधत आहे. ती तिला अनेक प्रश्न विचारले. मात्र चेहऱ्यावर कोणतंही दु:ख न दाखवता ती मोकळेपणाने त्यांच्याशी संवाद साधते.
जेव्हा ही महिला चिमुरडीला मम्मी-पप्पा कुठं आहे असा प्रश्न करते त्यावर रिद्धी नावाची ती चिमुरडी वारल्याचं सांगते. माझ्या पप्पांनी गळफास घेतला आणि आई दुसऱ्यांच्या घरात धुणंभाडी करते. तिचे ते शब्द ऐकून कोणालाही सुन्न व्हायला होईल. एकीकडे चिमुरडीची आई दुसऱ्यांच्या घरात धुणंभाडी करुन संसार सांभाळण्याचा प्रयत्न करतेय तर इथे ही रिद्धी मेथीची भाजी विकून आईला संसारात हातभार लावत आहे. सध्याच्या या शहरी जगात हा व्हिडीओ बऱ्याच गोष्टी शिकवतो. नवीन वर्षात सर्वत्र सेलिब्रेशन सुरू होतं, मात्र महाराष्ट्रातील कोणा एका जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात एक बाप नसलेली चिमुरडी आईला संसारात हातभार लावण्यासाठी रस्त्यात मेथीची भाजी विकते, ही गोष्ट अंत:करण जड करणारी आहे.