News18 Lokmat

Ranji Trophy : विदर्भाला सलग दुसऱ्यांदा विजेतेपद, सौराष्ट्रचे स्वप्न भंगले

सौराष्ट्रचे रणजी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगले, विदर्भाचा दणदणीत विजय

News18 Lokmat | Updated On: Feb 7, 2019 12:25 PM IST

Ranji Trophy : विदर्भाला सलग दुसऱ्यांदा विजेतेपद, सौराष्ट्रचे स्वप्न भंगले

नागपूर, 7 फेब्रुवारी : गतविजेत्या विदर्भाने यंदा सौराष्ट्रला 78 धावांनी पराभूत करून दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरले. अंतिम सामन्यात पाचव्या दिवशी सौराष्ट्रला दुसऱ्या डावात 127 धावांत गुंडाळून विदर्भाने विजय मिळवला.

पहिल्या डावात फक्त 5 धावांच्या आघाडीनंतर फलंदाजीला उतरलेल्या विदर्भाने दुसऱ्या डावात 200 धावा केल्या. विदर्भाकडून आदित्य सरवटेने सर्वाधिक 49 धावा केल्या. त्याला गणेश सतिश (35) आणि मोहित काळे (38) यांनी साथ दिली. सौराष्ट्रचा गोलंदाज धर्मेंद्रसिंग जडेजाने 96 धावात 6 गडी बाद केले.

विदर्भाच्या संघाने दिलेल्या 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सौराष्ट्राच्या फलंदाजांना 127 धावांपर्यंत मजल मारता आली. विश्वराज जडेजा वगळता एकही फलंदाज विदर्भाच्या माऱ्यासमोर तग धरु शकला नाही. विश्वराजने 52 धावा केल्या. विदर्भाच्या आदित्य सरवटेने फलंदाजीसह गोलंदाजीतही जबरदस्त कामगिरी केली. त्याने दुसऱ्या डावातही विदर्भाच्या 5 फलंदाजांना बाद केलं. त्याच्याशिवाय अक्षय वाखरेने 2 आणि उमेश यादवने 1 गडी बाद केला.

तत्पूर्वी, तिसऱ्या दिवशी सौराष्ट्रच्या संघाला विदर्भाने 307 धावांत गुंडाळले. त्यांना फक्त 5 धावांची आघाडी मिळाली. नाणेफेक जिंकून पहिल्या दिवशी विदर्भाने पहिल्या डावात फलंदाजी करत 312 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर सौराष्ट्राने 5 बाद 158 धावांपर्यंत मजल मारली होती.

सौराष्ट्रचा पहिला डाव 307 धावांत आटोपला. स्नेल पटेलच्या शतकानंतरही सौराष्ट्रला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. स्नेल पटेलनंतर कर्णधार जयदेव उनादकट वगळता इतर फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. विदर्भाच्या आदित्य सरवटेने 5 विकेट घेतल्या तर अक्षय वाखरेने 4 आणि उमेश यादवने 1 गडी बाद केला.

Loading...

पहिल्या डावात विदर्भाचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. सलामीवीर संजय रामास्वामी संघाच्या 21 धावा झाल्या असताना बाद धाला. त्यानंतर कर्णधार फैज फजल, वसिम जाफरही लवकर बाद झाले. विदर्भाकडून सर्वाधिक 73 धावा अक्षय कर्नेवारने केल्या. त्यानंतर अक्षय वाडकरने 45 धावा केल्या. सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटने 3 विकेट घेतल्या तर चेतन सकरिया आणि कमलेश मकवान यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

सौराष्ट्र याआधी रणजी ट्रॉफीत दोनवेळा अंतिम सामन्यात पोहचली होती. त्यांचे पहिल्यांदा विजेता बनण्याचे स्वप्न भंगले. विदर्भाने सलग दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं. गेल्या वर्षी विदर्भाने दिल्लीला हरवून पहिल्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2019 11:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...