हैदराबाद, 29 डिसेंबर : सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NRC) यासारख्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा होणं आवश्यक आहे आणि या दरम्यान हिंसाचाराला जागा नको असं आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu)यांनी केलं आहे. रविवारी ते हैदराबादमध्ये बोलत होते. 'सीएए किंवा एनपीआर असो, देशातील लोकांनी घटनात्मक संस्था, बैठका आणि माध्यमांमध्ये यावर सकारात्मक चर्चा करणं महत्त्वाचं आहे. हा कायदा कधी आला, का आला, त्याचा काय परिणाम होईल आणि कोणत्या बदलांची गरज आहे यावर अर्थपूर्ण आणि सकारात्मक चर्चेत भाग घ्यावा' असंही नायडू म्हणाले.
ते म्हणाले की, 'जर आपण यावर चर्चा केली तर आपली यंत्रणा बळकट होईल आणि लोकांना याची योग्य माहिती मिळेल' अविभाजित आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री एम. चन्ना रेड्डी यांच्या जयंती समारंभाचे उद्घाटन करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, असंतोष निर्माण करणाऱ्या लोकांच्या भीतीला दुर केलं पाहिजे.
ते म्हणाले की, "लोकशाहीमध्ये एकमत, मतभेद हे मूळ तत्व आहे. आम्हाला काही आवडेल की नाही हे दोन्ही बाजूंनी ऐकायला हवे आणि त्यानुसार कारवाई केली जावी. निदर्शनांच्या वेळी हिंसाचाराला वाव राहू नये. महात्मा गांधींनी अत्यंत भयंकर आव्हानांमध्येही सर्व प्रकारच्या हिंसाचार टाळले होते.' यावेळी बोलताना उपराष्ट्रपतींनी संसद आणि विधिमंडळांची प्रतिष्ठा कायम ठेवण्यावर आणि त्यातील चर्चेची पातळी वाढवण्यावर भर दिला. ते म्हणाले की, धोरणांवर टीका करताना खासगी टीका होऊ नये.
दरम्यान, 2019 मधला शेवटचा 'मन की बात' या कार्यक्रमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. पंतप्रधानांनी देशवासियांना नवीन वर्षाच्या, नव्या दशकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 'मन की बात'चा आजचा 60 वा कार्यक्रम आहे.
अराजकतेबाबत काय म्हणाले पंतप्रधान...
आजची युवापिढी ही सोशल मीडीया जनरेशन आहे. युवावर्ग व्यवस्थेवर विश्वास ठेवते आणि व्यवस्थेला प्रश्नही विचारते. नव्या पिढीकडून अनेक अपेक्षा आहेत. भारताला नव्या पिढीवर विश्वास असल्याचे सांगत अराजकतेबाबत युवावर्गाला चीड असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
देशात अव्यवस्था, अराजकता दिवसेंदिवस वाढत आहे. जातीयवाद, कौटुंबिक वाद सारख्या अव्यवस्था तरुणाईला पसंत नाही. देशातील तरुण प्रत्येक दिवशी काही तरी नवे करण्याच्या विचारात आहे. तरुणाईला एक उत्तम व्यवस्था अपेक्षित आहे. मात्र, एखादी व्यवस्था योग्यप्रकारे काम करत नसेल तर तरुणाई अस्वस्थ होते. तरुणाई अस्वस्थ होणे, हेच आवडत असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. अव्यवस्था, अराजकता, जातीयवादबाबत युवावर्गाला चीड आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Vice president