Home /News /news /

राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेसैनिक आक्रमक, नवी मुंबई महावितरणचे कार्यालय फोडले, VIDEO

राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेसैनिक आक्रमक, नवी मुंबई महावितरणचे कार्यालय फोडले, VIDEO

लॉकडाउनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहे.

    नवी मुंबई, 11 ऑगस्ट : लॉकडाउनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहे. वीज बिल कमी करावे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबद्दल राज्य सरकारला पत्र लिहिले होते. त्यानंतर आता मनसे कार्यकर्त्यांनी आपल्या स्टाईलने आंदोलन सुरू केले आहे. नवी मुंबई आज सकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. वाशी सेक्टर 17 मधील महावितरणच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. कार्यालयाच्या काचा आणि फर्निचरची कार्यकर्त्यांनी तोडफोड करून वीज बिल दरवाढीचा निषेध केला आहे. काही दिवसांपूर्वी वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. वीज प्रश्नावर राज्य सरकारचं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. भरमसाठ वीज बिलं म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यांवर प्रहारच आहे, असंही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले होते. वीज बिलांच्या मुद्यावर मनसे गप्प राहील अशी चुकीची समजूत सरकारने करुन घेऊ नये, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला होता. नागपूरमध्ये वीज बिलामुळे एकाची आत्महत्या दरम्यान, सोमवारी  नागपूरमधील यशोधानगर पोलीस स्टेशन हद्दीत वीज बिल जास्त आल्यामुळे लीलाधर गायधणे या व्यक्तीने आत्महत्या केली होती. लीलाधर गायधणे यांना एकत्रित तब्बल 40 हजार रुपयांचे वीज बिल आले होते. अचानक एवढ्या मोठ्या रक्कमेचे वीज बिल आल्यामुळे गायधणे अस्वस्थ झाले होते. त्यांनी बिल कमी करावे या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयात तक्रार केली होती. पण, अनेकदा प्रयत्न करुनंही वीज बिल कमी झालं नाही. वीज बिल भरले नसल्याने वीज खंडीत होण्याची गायधणे यांना भीती होती. त्यामुळे त्यांनी स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली.  नागपूर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. परंतु, गायधणे यांच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: MNS, नवी मुंबई, मनसे, महावितरण, राज ठाकरे

    पुढील बातम्या