मायावतींच्या बैठकीत नेत्यांना मोबाईल, घड्याळ आणि जोडेही काढून जावं लागलं

मायावतींच्या बैठकीत नेत्यांना मोबाईल, घड्याळ आणि जोडेही काढून जावं लागलं

ज्या भावाची भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून हकालपट्टी केली त्यांना मायावतींनी पुन्हा पक्षात मानाचं स्थान दिलंय.

  • Share this:

लखनऊ 23 जून : बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी पक्षात मोठे बदल केले आहेत. मायावतींनी त्यांचे भाऊ आनंद कुमार यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केलीय. तर भाचा आकाश आनंद याला राष्ट्रीय संयोजक करण्यात आलंय. मायावतींच्या लखनऊतल्या घरी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. या बैठकीसाठी आलेल्या सर्व नेत्यांना बैठकीसाठी जाताना त्यांचे मोबाईल, घडाळ, जोडे बाहेर ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. तर महिलांना गळ्यातले दागिनेही काढून ठेवण्यास सांगण्यात आलंय.

या बैठकीत पुढची रणनीती ठरवली जाणार होती. त्याचबरोबर महत्त्वाच्या घोषणाही मायावती करणार होत्या. त्यामुळे कुठलीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी  सर्व सामान बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं बसपाच्या सूत्रांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीत बसपा आणि सपाने आघाडी केली होती. यात राज्यातल्या एकूण 80 जागांपैकी बसपाला 10 तर सपाला फक्त 5 जागा मिळाल्या होत्या.

या आधीही आनंद कुमार हे पक्षात सक्रीय होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने मायावतींनी त्यांना सर्व पदांपासून दूर केलं होतं. नंतर अनेक वर्ष ते पक्षात असलेतरी सर्व पदांपासून दूर होते. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर जी राजकीय परिस्थिती बदलली त्यानंतर मायावतींनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातं.

तर भाचा आकाश आनंद याला मायावती या आपला वारसदार म्हणून पुढे करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून तो मायावतींसोबत सक्रीय होता. अनेक महत्त्वांच्या कार्यक्रमांना तो मायावतींच्या सोबत दिसत होता. त्यालाही राष्ट्रीय समन्वयक करून मोठी जबाबदारी दिली आहे.

कोण आहे आकाश आनंद?

लंडनमध्ये MBA झालेला आनंद आता भारतात परतला असून आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत असतानात राजकारणातही सक्रीय झालाय. आणि राजकारणाचे धडेही गिरवतोय. आणि त्याच्या गुरु आहेत खुद्द मायावती. मायावती म्हणाल्या, " आकाशला मी बसपाशी जोडलं आहे. बसपा ही चळवळ आहे.

त्याला शिकण्याची संधी दिली माहिजे. यामुळे जातीयवादी माध्यमं आणि काही लोकांना काय वाटतं याचा मी कधीच विचार करत नाही." मी कांशीरामजींची शिष्या आहे त्यामुळे जशास तसे उत्तर देण्याची कला मला माहित आहे असा इशाराही त्यांनी दिला.

या आधी मायावतींचे भाऊ आनंद हे बसपाचे उपाध्यक्ष होते. त्यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर मायावतींनी त्यांना सर्व पदावरुन दूर केलं होतं. तेव्हापासून त्यांच्या कुटुंबातला कुठलाही सदस्य बसपात पदावर नव्हता.

आता आकाश सक्रीय झाल्याने मायावतींवर पुन्हा घराणेशाहीचा आरोप होतोय. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. मी कधीच घराणेशाही केली नाही. टीका करणाऱ्यांनी करत राहावी असं सांगत त्यांनी आकाशच्या राजकारणातल्या पदापर्णाचं स्वागत केलं.

मायावतींचा वाढदिवस, महत्त्वाच्या पत्रकार परिषदा, बैठका अशा सगळ्या ठिकाणी आकाशची उपस्थिती असते. त्यामुळे त्याला मायावती आपला उत्तराधिकारी म्हणून घडवत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

First published: June 23, 2019, 5:12 PM IST

ताज्या बातम्या