लंडन, 13 जानेवारी: जगामध्ये अनेक ठिकाणी शाळेत जाताना भरपूर कपडे घालण्याचे नियम बनवले आहे. असे नियम खासकरून आखाती राष्ट्रांतींल विविध शाळेत पाहायला मिळतात. पण सध्या एका मुलीला वेगळीच समस्या भेडसावत आहे. तिच्या शाळेने तिला लॉंग स्कर्ट घालण्यापासून मज्जाव केला आहे. ही मुलगी केवळ 12 वर्षांची असून ती इतर विद्यार्थींनींपेक्षा थोडासा लाब स्कर्ट घालून शाळेला जाते. गेल्या काही वर्षांपासून ती अशाप्रकारच्या गणवेश घालून शाळेला जाते. मात्र मागील महिन्यांत शाळेच्या नियमांत केलेल्या बदलांमुळे तिला या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
संबंधित मुलीचं नाव सिहम असं आहे. ती लॉंग स्कर्ट घालते म्हणून शालेय प्रशासनाने तिला डिसेंबर महिन्यात दररोज घरी परत पाठवलं आहे. शिवाय शालेच्या गणवेश वरील स्कर्ट परिधान करून येण्याची सक्ती केली आहे. पण सिहमने प्रत्येक वेळी या सक्तीचा विरोध केला आहे. संबधित घटना ब्रिटनमधील असून ही शाळा मिडलसेक्स परिसरात आहे. त्याचबरोबर शालेय प्रशासनाने सिहमचे पालक इदरीस आणि त्यांची पत्नी सलमावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे.
ब्रिटनमध्ये सध्या कोरोना लॉकडाऊन आहे. त्यामुळे सिहम सध्या घरीच शिकत आहे. 'माझ्या श्रद्धेमुळेच ते मला त्रास देत आहेत, असं सिहमचं म्हणणं आहे. मला वाटतं की, त्यांनी मला माझा शाळेचा गणवेश घालू द्यायला हवा. मला शाळेत जायला आवडतं. माझ्या धर्मामुळे ते मला स्विकारत नाहीयेत, पण हे चुकीचं आहे. या सर्व तमाशामुळं माझा शाळेचा एक महिना वाया गेला आहे.
सिहमचे वडील एक क्रीडा कोच आहेत. त्यांनी म्हटलं की, माझ्या मुलीच्या धार्मिक आस्थेमुळं शाळा तिला डावलत आहे. तिच्या स्कर्टचा साइज इतर मुलींपेक्षा काही सेंटीमीटरच मोठा आहे. मोठा स्कर्ट घालण्यासाठी आम्ही तिच्यावर कोणतीही सक्ती केली नसून मोठा स्कर्ट घालण्याचा निर्णय स्वतः सिहमचा आहे. शाळा प्रशासनाने याप्रकरणी कारवाई करण्याची धमकीही दिली आहे, अशी माहिती सिहमचे वडील इदरीस यांनी दिली.