• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत; रोहित पवारांची युजीसीला कोपरखळी

मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत; रोहित पवारांची युजीसीला कोपरखळी

मोफत लसीकरणाबाबत नरेंद्र मोदींचे आभार मानणारे फलक विद्यापीठ आणि महाविद्यालयानं आपापल्या परिसरात लावावेत, अशा आशयाचं परिपत्रक युजीसीकडून जारी करण्यात आलं आहे. युजीसीच्या या निर्णयावर रोहित पवारांनी खोचक टीका केली आहे.

 • Share this:
  अहमदनगर, 24 जून:  'लोकांनी भरलेल्या 'टॅक्स'मधून केलं जाणारं लसीकरण म्हणजे उपकार नाहीत. तर कोणत्याही सरकारचं ते कर्तव्यच आहे. पण मोफत लसीकरणाबाबत पंतप्रधानांचे आभार मानणारं फलक लावण्याची यूजीसीची सूचना आश्चर्यकारक आहे. कदाचित ही गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनाही माहीत नसेल,' अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार युजीसीला खडेबोल सुनावले आहेत. अलीकडेच केंद्र सरकारनं कोरोना प्रतिबंधक लशीची जबाबदारी आपल्याकडे घेतली आहे. गेल्या आठवड्यात याबाबतची घोषणा केली असून देशातील 18  वर्षांपुढील सर्व नागरिकांना मोफत लसीकरण देणार असल्याची घोषणा केली आहे. 21 जूनपासून मोफत लसीकरणाचं कामही सुरू झालं आहे. दरम्यान विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीनं एक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकाच्या माध्यमातून मोफत लसीकरणासंबंधी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानणारे फलक विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी लावावेत असे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं विविध भाषांत डिझाइन केलेले फलकही पाठवण्यात आले आहेत. युजीसीच्या या निर्णयावर आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. केंद्र सरकारच्या या धोरणावर अनेकांनी टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी देखील ट्वीट करून युजीसीसोबतच शिक्षणमंत्र्यावर देखील निशाणा साधला आहे. हेही वाचा- 'घाईघाईने व्यवहार खुले करू नका', मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली मोठी भीती! रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, यूजीसीचा हा निर्णय पंतप्रधानांना कदाचित माहिती नसावा. मोदींना खूश करण्यासाठी शिक्षण विभागाच्या मंत्र्यांच्या सूचनेनुसार यूजीसीनं हा निर्णय घेतला असावा. आपल्या फायद्यासाठी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला राजकारणात ओढणं चुकीचं आहे. कोरोना आणि विद्यार्थी यांच्याबाबत तरी असं राजकारण करु नये,' असंही पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: