आताची सर्वात मोठी बातमी, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना फोन!

आताची सर्वात मोठी बातमी, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना फोन!

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. उद्या शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 27 नोव्हेंबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. उद्या शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा होणार आहे. यासाठी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून निमंत्रण दिलं आहे. तसंच निमंत्रण पत्रिकाही फॅक्सद्वारे पाठवण्यात आली आहे.

गुरुवारी शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत सेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई शपथ घेणार आहे. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील हे शपथ घेतील. तर कॉंग्रेसकडून बाळासाहेब थोरात हे शपथ घेणार आहे.

शपथविधीचं निमंत्रण देण्यासाठी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आज संध्याकाळी तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. दिल्लीत पोहोचल्यानंतर सर्वात आधी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण दिलं.  त्यानंतर दोन्ही नेत्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर ते तातडीने मुंबईला रवाना झाले.

परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आदित्य ठाकरे यांनी भेट होऊ शकली नाही. खुद्द उद्धव ठाकरे यांनी फोन करून मोदींना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं. तसंच शपथविधीचं निमंत्रण पत्र हे फॅक्सद्वारे पाठवण्यात आलं आहे. तसंच या भेटी दौऱ्यात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेण्याचं ठरलं होतं परंतु,  आदित्य ठाकरे यांनी भेट घेण्याचं टाळलं. मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानातून बाहेर पडल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, उद्या होणार्‍या शपथविधी कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याकरता दिल्लीत आलो होतो.' यानंतर आदित्य ठाकरे मुंबई करता रवाना झाले.

दरम्यान, त्याआधी मुंबईतील यशवंत चव्हाण सेंटरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह घटक पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत तब्बल 3 तासांहून जास्त चर्चा झाली. या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दोन महत्त्वाचे बदल जाहीर केले आहे. उपमुख्यमंत्री पद हे राष्ट्रवादीकडेच असणार आहे. तर विधानसभेचं अध्यक्षपद हे काँग्रेसकडे राहणार आहे. उद्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रत्येक पक्षाचा एक किंवा दोन नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. अशी माहिती पटेल यांनी दिली.

उर्वरीत मंत्रिमंडळाचा विस्तार हा 3 डिसेंबर अर्थात विश्वासदर्शक ठराव पास केल्यानंतर होणार आहे, असंही पटेल यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे, काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्रिपदी बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा होती. आता उपमुख्यमंत्रिपद हे राष्ट्रवादीकडेच असणार आहे. त्यामुळे अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. या बैठकीत शरद पवार, उद्धव ठाकरे, अहमद पटेल, जयंत पाटील, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे, सुनील तटकरे यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते हजर होते.

मुख्यमंत्रिपद सेना, उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे!

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये खातेवाटपावर निर्णय झाला आहे. शिवसेनेकडे मुख्यमंत्री आणि 11 मंत्रिपदं असणार आहे. तसंच 4 राज्यमंत्रिपदही असणार आहे.  नगरविकास, सामान्य प्रशासन आणि उत्पादन शुल्क आणि जीएसटी ही खाती असणार आहे.

त्यापाठोपाठ राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रिपद आणि 12 महत्त्वाची खाती  असणार आहे. तसंच 4 कॅबिनेटपदही मिळणार आहे. यामध्ये गृह, अर्थ, सार्वजनिक बांधकाम सारखी मुख्य खाती ही राष्ट्रवादीकडे असणार आहे. यात महामंडळाचाही समावेश असणार आहे.

तर काँग्रेसकडे विधानसभेचं अध्यक्षपद आणि 10 महत्त्वाची खाती असणार आहे. तसंच 2 राज्यमंत्रिपदही असणार आहे.  यामध्ये कृषी, महसूल, गृहनिर्माण आणि जलसंपदा ही महत्त्वाची खाते असणार आहे. यात महामंडळाचाही समावेश असणार आहे.

असं असेल संभाव्य खातेवाटप!

काँग्रेस - कृषी, महसूल, महिला आणि बाल कल्याण, अन्न आणि नागरी पुरवठा, उच्च शिक्षण, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा

राष्ट्रवादी - गृह, अर्थ, सार्वजनिक बांधकाम, सहकार, वैद्यकीय शिक्षण, जलसंधारण, पर्यटन, ग्रामविकास

शिवसेना - नगरविकास, सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण, उद्योग, एमएसआरडीसी, संसदीय कामकाज, उत्पादन शुल्क आणि जीएसटी, परिवहन, शालेय शिक्षण

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2019 11:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading