उदयनराजे भोसलेंनीही धमकी दिली, सदावर्तेंचा आरोप

उदयनराजे भोसलेंनीही धमकी दिली, सदावर्तेंचा आरोप

मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टाच्या परिसरात एका तरुणाने मारहाण केली

  • Share this:

विवेक कुलकर्णी,प्रतिनिधी

मुंबई, 10 डिसेंबर : मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणारे  ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टाच्या परिसरात एका तरुणाने मारहाण केली. या घटनेनंतर सदावर्ते यांनी पोलीस संरक्षण देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.

महाधिवक्ता आशुतोष कुंभकोण यांनी सदावर्ते यांच्यावरील हल्ल्याची माहिती मुख्य न्यायमूर्तींना दिली. यावेळी सदावर्ते यांनी  मला आलेल्या १००० धमक्यांमध्ये साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे  खासदार उदयनराजे भोसले यांचाही समावेश असल्याचा  आरोप केला.  न्यायमूर्तींनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले आहे.

काय घडलं कोर्टाबाहेर?

मुंबई हायकोर्टात आज मराठा समाज आरक्षण प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणी झाल्यानंतर याचिकाकर्ते वकील गुणरत्न सदावर्ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत एक तरुणाने सदावर्ते यांच्यावर हल्ला केला आणि बेदम मारहाण केली. वैद्यनाथ पाटील असं या तरुणाचं नाव आहे. तो जालना जिल्ह्यातला रहिवासी आहे. मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली या रागातून या तरुणाने  एक मराठा लाख मराठा घोषणा देत हल्ला केला. तिथे उपस्थितीत असलेल्या पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं.

सदावर्तेंची कोर्टात याचिका

राज्य सरकारने 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण जाहीर करणं हे राज्यघटनेविरोधात आहे, अशी भूमिका घेत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीनं ही याचिका सादर करण्यात आली.

आरक्षणाविरोधात याचिका दाखल होण्याची हीच शक्यता लक्षात घेऊन मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलं आहे. त्यामुळे आरक्षणाविरोधातील याचिकेवर निर्णय देण्याआधी कोर्टाला विनोद पाटील यांचंही म्हणणं ऐकून घ्यावं लागेल. दुसरीकडे, मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारनेही सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केलं आहे. राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर या आरक्षणाविरोधात काही लोक कोर्टात जाण्याची शक्यता होती. हीच शक्यता लक्षात घेऊन मराठा आरक्षण टिकावं, यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचललं आहे.

मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर राज्य सरकारने दोन्ही सभागृहात विधेयक संमत करत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिलं आहे. पण या आरक्षणाविरोधात कोर्टात जाण्याची भूमिका काही जणांकडून घेण्यात येत आहे.

========================

First published: December 10, 2018, 3:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading