किरण मोहिते, प्रतिनिधी
सातारा, 01 जुलै : देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पण असलं तरी आपल्याकडे कोरोनाचा गरजेपेक्षा जास्त बाऊ करण्यात आला आहे. कोरोनापेक्षा जास्त मृत्यू हे रस्ते अपघातात झाले आहे, असं परखड मत भाजपचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं. तसंच कोरोनावर आपल्याकडे स्वीडनप्रमाणे हर्ड इम्युनिटाचा (herd immunity) वापर करावाच लागणार आहे, असंही उदयनराजे म्हणाले.
उदयनराजे यांनी बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन सदिच्छा भेट घेतली. त्यांनतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे भोसले यांनी आपल्या शैलीत चौफेर फटकेबाजी केली.
'कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे, यात वाद नाही. पण, लोकांना जास्तच घाबरवण्यात आलं आहे. याआधीही आपल्याकडे स्वाईन फ्लू सारखे साथीचे आजार येऊन गेले. एवढंच नाहीतर इतर आजारातूनही लोकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. सीमेवर आणि वृद्धावस्थेमुळे लोकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यापेक्षा दहापटीने अधिक मृत्यू हे तर रस्ते अपघातात झाले आहेत.त्यामुळे कोरोना आहेच हे लक्षात ठेवून लोकांनी परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे, असं उदयनराजे म्हणाले.
कोरोनाचा जास्तच बाऊ केला गेला , उदयनराजे भोसलेंची प्रतिक्रिया pic.twitter.com/gNyKCGoQTs
— News18Lokmat (@News18lokmat) July 1, 2020
तसंच, 'राज्य सरकारानेही सारखे लॉकडाउन करून लोकांना अडकून ठेवू नये. लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे काही कोरोनावर मात करता येणार नाही. योग्य काळजी घेऊन उद्योग धंदे सुरू केले पाहिजे', असंही उदयनराजे म्हणाले.
आजोबांच्या मृतदेहाशेजारी बसलेल्या नातवाचे दहशतवाद्यांपासून जवानांनी वाचवले प्राण
दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर उदयनराजेंनीही आपल्या नेहमीच्या तिरकस शैलीत यावर प्रतिक्रिया दिली. 'भाजप नेते गोपीचंद पडळकर हे मला विचारून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलले नाहीत. माझं मत मी परखडपणे मांडत असतो. पवार आणि पडळकर त्यांचं ते बघून घेतील,' अशी खोचक प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
संपादन - सचिन साळवे