वर्धा, 14 जुलै : वर्ध्याच्या पुलगावमध्ये सैराट सिनेमाची पुन्नरावृत्ती करणार एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बहिणीशी प्रेमप्रकरण केल्यामुळे भावाने तरुणाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. रस्त्याने जातान अंधारात दोन बाईकस्वारांनी तरुणावर चाकूने वार करत पळ काढला. पण पोलिसांच्या शोध पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जयकुमार वाणी असं हत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. जयकुमार अक्षय माहुरे या मित्राच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. ही बाब अक्षयला समजताच त्याला राग अनावर झाला आणि त्याने जयकुमारची हत्या केली. अक्षयने त्याचा मित्र आशिष लोणकरसोबत जयकुमारला मारण्याचा कट रचला. त्यानंतर जयकुमारला रात्री उशिरा रस्त्याने जात असतान गाठलं आणि त्याच्यावर चाकूने वार करत त्याची हत्या केली.
अक्षयने त्याच्या मित्रासोबत जयकुमारवर इतका जोरात हल्ला केला की त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्ला झाल्यानंतर अक्षय आणि त्याच्या मित्राने पळ काढला. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. वर्धा स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयकुमार हा पुलगावच्या भीम नगरमध्ये राहत होता. त्याचा डीजेचा व्यवसाय होता. अक्षयला बहिणीचे जयकुमारशी प्रेमसंबंध मान्य नव्हते. त्यामुळे त्याने जयकुमारची हत्या केली.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून जयकुमारचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. जयकुमारच्या अशा जाण्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
VIDEO: ब्रह्मपुत्रा नदीचं रौद्ररूप, पाण्यातल्या बोटीसारखी वाहून गेली शाळा