हरवलेली आई दोन वर्षांनी लेकाला भेटली, डोंबिवलीतील हृदयस्पर्शी घटना

हरवलेली आई दोन वर्षांनी लेकाला भेटली, डोंबिवलीतील हृदयस्पर्शी घटना

पलावा इथं एकता प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यकर्ते लॉकडाउन काळात गरजूंना जेवण वाटप करत आहेत. जेवण देत असताना त्यांना एक वृद्ध महिला निदर्शनास आली.

  • Share this:

डोंबिवली,10 मे : स्मृतिभ्रंश झाल्यामुळे घर, कुटुंब याबाबत एका महिलेला काहीच आठवत नव्हतं अशा अवस्थेत अन्नासाठी भटकणारी एक महिला  लॉकडाउनदरम्यान जेवण वाटप करत असताना सामाजिक कार्यकर्त्यांना दिसली. काहीतरी समस्या असल्याचे त्यांनी हेरले आणि पोलीस, मनसे आमदाराच्या मदतीने तिच्या कुटुंबीयांचा शोध सुरू झाला. सोशल मीडियाद्वारे अखेर तिच्या मुलाचा ठाव लागला आणि या मायलेकांची दोन वर्षांनी भेट झाली. ही हृदयस्पर्शी घटना घडली ती डोंबिवलीत.

पलावा इथं राहणारे एकता प्रतिष्ठानचे हसन खान, भास्कर गांगुर्डे व समीर कोंडाळकर हे सामाजिक कार्यकर्ते लॉकडाउन काळात गरजूंना जेवण वाटप करत आहेत. काही दिवसांपूर्वी जेवण देत असताना त्यांना एक वृद्ध महिला निदर्शनास आली. ही महिला चांगल्या घरची असल्याचा संशय आल्याने त्यांनी या महिलेला विश्वासात घेत विचारपूस केली असता त्यांना या महिलेचा स्मृतिभ्रंश झाला असल्याचं लक्षात आलं. त्यांनी तत्काळ मानपाडा पोलिसांसह मनसे आमदार राजू पाटील यांना माहिती दिली. मानपाडा पोलिसांनी या महिलेला वृद्धाश्रमात दाखल करण्यास सांगितलं. हसन खान आणि भास्कर गांगुर्डे यांनी तिला वृद्धाश्रमात नेले, मात्र लोकडाउनमुळे तिला तेथे घेण्यास नकार देण्यात आला.

हेही वाचा - भांडण झाल्याने फेसबुक फ्रेंडला भेटायला गेली पत्नी, पतीच्या जिवाला घोर

आमदार पाटील यांच्या सांगण्यानुसार, त्यांनी महिलेचे फोटो आणि माहिती सोशल मीडियावर अपलोड केली. काही तासांत महिलेची ओळख पटली या महिलेचे नाव हर्षा ठक्कर असून तिचा मुलगा तेजस आयटी कंपनीत कामाला असल्याची माहिती या दोघांना मिळाली. त्यांनी याबाबत मानपाडा पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधव यांनी या महिलेच्या मुलाच शोध सुरू केला.

दोन वर्षांपूर्वी तेजसने हर्षा ठक्कर हरवल्याबाबत पुणे येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहितीही मिळाली. तेजस सध्या गुजरात येथे स्थायिक झाल्याचे कळले. पोलिसांनी तेजसला संपर्क साधत त्याला माहिती दिली. आता प्रश्न होता तो येण्याचा. मानपाडा पोलिसांनी गुजरात पोलिसांशी समन्वय साधला. आमदार पाटील यांच्या प्रयत्नांनी त्याला तातडीने पास मिळणे शक्य झाले.

हेही वाचा -बघता-बघता नदीत तयार झाला खड्डा...समोर आलेलं सगळं केलं गिळंकृत, VIDEO VIRAL

अखेर शनिवारी तेजसने डोंबिवलीतून आपल्या आईला परत नेले. दोन वर्षांनी आईची भेट झाल्याने तेजस भारावून गेला. त्याने एकता प्रतिष्ठान,पलावाचे समाजिक कार्यकर्ते यांच्यासह मानपाडा पोलीस, मनसे आमदार राजू पाटील यांचे आभार मानले.

संपादन - सचिन साळवे

First published: May 10, 2020, 5:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading