रायपूर, 4 ऑगस्ट : चुलीजवळ ठेवलेल्या लाकडांनी (Wood) अचानक पेट (Fire) घेतल्यामुळे घरात झोपलेल्या सासू (mother in law) आणि तिच्या सुनेचा (daughter in law) झोपेतच मृत्यू (death) झाला. सकाळी घरातून धूर येत असल्याचं पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी खिडकी तोडल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. झोपेत असताना धुराचं साम्राज्य पसरल्यामुळे या दोघींना झोपेतच मृत्यूनं गाठलं असावं, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं?
छत्तीसगडमधील बिलासपूर गावात प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मिळालेल्या कुटुंबात सासू खोरबहरीन पटेल (वय 75) आणि सून द्रौपदी बाई पटेल ( वय 55) या दोघी राहत होत्या. खोरबहरीन यांना दोन मुली असून त्या दोघींची लग्नं झाली आहेत. त्यामुळे सध्या सासू आणि सून या दोघीत घरात राहत होत्या. रात्री स्वयंपाक करून झाल्यावर नेहमीची आवराआवर करून त्या झोपल्या. मात्र घरातील चुलीपाशी काही सुकी लाकडं पडल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही.
स्वयंपाक झाल्यावरही घरातील चुलीचा विस्तव पूर्णपणे विझला नव्हता. त्या झोपल्यानंतर काही वेळाने शेजारी असलेल्या लाकडाने पेट घेतला. त्यानंतर बघता बघता घरातील सर्व लाकूडफाटा पेटला आणि घरात धुराचं साम्राज्य पसरलं. मात्र गाढ झोपेत असणाऱ्या या दोघींना त्याचा काहीही मागमूस लागला नाही.
दुसऱ्या दिवशी झाला उलगडा
दुसऱ्या दिवशी घरातून धूर येत असल्याचं शेजाऱ्यांना दिसलं. त्यांनी दार ठोठावलं, मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाल नाही. दरवाजा आतून बंद असल्यानं ग्रामस्थांनी खिडकीतून डोकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही ग्रामस्थांनी खिडकी तोडून आतमध्ये पाहिलं असता धुराचं साम्राज्य पसरलं होतं आणि सासू-सून यांचे मृतदेह घरात पडले होते.
हे वाचा -कर्कश आवाजासह नियमांचा फज्जा; संसदेपासून 500 मीटरवर बारबालांचा धांगडधिंगा
ग्रामस्थांनी या घटनेची पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला. धुरात गुदमरून या दोघींचा मृत्यू झाल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.