नागपूर, 21 एप्रिल : नागपूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परंतु, अशा परिस्थितीत नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात आरोप-प्रत्यारोपाची फेरी झडली आहे.
नागपूरच्या आमदार निवास आणि इतर ठिकाणी कोरोना संशयितांना एकत्र क्वारंटाइन करून ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे महापौर संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे यांच्यावर टीका केली होती.
हेही वाचा - ...आणि रतन टाटांनी 'ती' खंत बोलून दाखवली, म्हणाले...
तुकाराम मुंढे यांनी संदीप जोशींच्या आरोपांचं खंडन केलं आहे. नागपुरात क्वारंटाइन केलेल्या जागेवर जत्रेत स्वरूप म्हणणं चुकीचे आहे. नागपूरच्या आमदार निवासात सगळं काही ठीक आहे, अशी माहिती मुंढे यांनी दिली.
आमदार निवासात सुरुवातीला काही अडचणी आल्या होत्या, पण वेळीच क्वारंटाइन असलेल्या जागी दक्षता घेण्यात येऊन नियमाप्रमाणे काम सुरू असल्याचंही तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
काय म्हणाले होते महापौर?
तुकाराम मुंढे यांना इथं येऊन दोनच महिने झाले आहे. ते कुणाचंही काही ऐकत नाही. इथल्या परिस्थितीबद्दल त्यांना माहिती दिली होती. आमदार निवासात अनेकजण एकत्रितपणे वावरत आहेत. ज्यावेळी तपासणी अहवाल आला. त्यावेळी यातील काहींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, तोपर्यंत त्यांच्यामुळे इतरांनीही लागण होण्याची भीती जास्त आहे. त्यामुळे आधी तपासणी करून जे पॉझिटिव्ह येताहेत त्यांच्यावर उपचार आणि जे निगेटिव्ह येताहेत त्यांनाच क्वारंटाइन करून ठेवावे, असा सल्ला महापौरांनी दिला होता.
हेही वाचा -विकी कौशल, राजकुमार रावची सोसायटी सील; डॉक्टरची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह
तसंच, 'हे करताना ज्यांना अधिक लक्षणं आहेत. त्यांना लाल आणि ज्यांना नाही त्यांना हिरवा टॅग लावा. असं न केल्यास जर शहरात कोरोनाबाधितांचा आकडा आणखी वाढला तर याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असं म्हणत महापौरांनी तुकाराम मुंढे यांचं नाव न घेता टीका केली होती.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nagpur