इंदुरीकरांच्या तोंडाला काळं फासू आणि मुख्यमंत्र्यांना कोंडून घेऊ, तृप्ती देसाईंचा इशारा

इंदुरीकरांच्या तोंडाला काळं फासू आणि मुख्यमंत्र्यांना कोंडून घेऊ, तृप्ती देसाईंचा इशारा

तृप्ती देसाई यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच इशारा दिला आहे.

  • Share this:

अहमदनगर, 18 फेब्रुवारी : किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आक्रमक झालेल्या भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच इशारा दिला आहे. इंदुरीकरांवर गुन्हा दाखल न झाल्यास मुख्यमंत्रांना कोंडू, अधिवेशनात गोंधळ घालू, असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

प्रसिध्द किर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करा, अशी मागणी आज भूमाता बिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक सागर पाटील यांना भेटून केली. त्याचबरोबर इंदोरीकर महाराज हे महिलांचा आपल्या किर्तनातून वेळोवेळी अपमान करतात, त्यांच्या समर्थकांनी माझ्यावर खालच्या पातळीवर समाजमाध्यमात, फोनवर टीका-टिपण्णी केली आहे, यासाठीही महाराजांवर स्वतंत्र गुन्हा दाखल करावा अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.

पोलिसांनी आपल्या मागणीचा विचार करून लवकरच कारवाई होईल असे सांगितले आहे. मात्र जर पोलिसांनी अथवा पीसीपीएनडीटी कायद्यानुसार लवकर कारवाई झाली नाही तर आपण इंदोरीकर यांच्या अकोल्यात जाऊन त्यांना काळे फासू, तसेच येणाऱ्या अधिवेशन काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या दालनात कोंडू आणि अधिवेशनात गोंधळ घालू असा इशारा दिला आहे.

हेही वाचा- 'हेमंत करकरे यांची हत्या कसाबच्या गोळ्यांनी नव्हे, महाराष्ट्र पोलिसांच्या पिस्तूलने झाली'

दरम्यान, पुण्याहून आज भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह देसाई या मोठया पोलीस बंदोबस्तात नगरला आल्या. हिंदू राष्ट्र सेनेच्या स्मिता अष्टेकर यांच्यासह काही संघटनांनी त्यांना नगरमध्ये आल्यास जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तृप्ती देसाई यांना प्रचंड पोलीस बंदोबस्तात नगरमध्ये आणले.

First published: February 18, 2020, 6:50 PM IST

ताज्या बातम्या