मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

ट्रिपल तलाकवर सुप्रीम कोर्टात सहा दिवस सुरू राहणार सुनावणी

ट्रिपल तलाकवर सुप्रीम कोर्टात सहा दिवस सुरू राहणार सुनावणी

11 मे : मुस्लिम समाजातील ट्रिपल तलाक पद्धतीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. संविधान खंडपीठ आजपासून दररोज ट्रिपल तलाकवर सुनावणी करणार आहे. पुढील सहा दिवस ही सुनावणी सुरू राहणार आहे.

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जगदिश सिंह खेहर यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय खंडपीठ ही सुनावणी करणार आहेत. या खंडपीठात शिख, ख्रिश्चन, पारशी, हिंदू आणि मुस्लिम समुदायाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या न्यायाधिशांचा समावेश आहे.

आज पहिल्या दिवशी या प्रकरणात कोणत्या मुद्यांवर सुनावणी करायची, हे ठरवलं जाणार आहे. मुस्लिम पर्सनल लॉमधील कालबाह्य तरतुदींवरही या सुनावणीदरम्यान युक्तीवाद होणार आहेत. तसंच निकाह, हलाला आणि बहुविवाह पद्धतीवरही खंडपीठासमोर सुनावणी केली जाईल.

ट्रिपल तलाकविरोधात सुप्रीम कोर्टात 7 याचिका दाखल झाल्या आहेत. यापैकी 5 याचिका या मुस्लिम महिलांनी दाखल केल्या आहेत. या सर्व याचिकांमधून 3 तलाक पद्धत हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, तलाकसारख्या संवेदनशील मुद्द्यावर तातडीने निर्णय घेता यावा, यासाठी कोर्टाने उन्हाळ्याच्या सुट्यामध्येही या प्रकरणी सुनावणी करण्याचे ठरवले आहे. शिवाय, शनिवार आणि रविवारीही  सुनावणी करण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे.

मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे म्हणणं

जेव्हा वैवाहिक संबंधांत बेबनाव निर्माण होतो आणि पतीला पत्नीपासून विभक्त व्हावे वाटू लागते, तेव्हा वेळखाऊ न्यायालयीन प्रक्रियेमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि पती विभक्त होण्यासाठी पत्नीची प्रसंगी हत्याही करू शकतो. अशा स्थितीत तलाक या शब्दाचा तीनदा उच्चार करून पत्नीला तलाक देणं हा उत्तम मार्ग आहे, असं या मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने सुप्रीम कोर्टाला याआधीच्या सुनावणीत सांगितलं होतं.

तिहेरी तलाक घटनाबाह्य, अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय

'मुस्लिम समाजात प्रचलित असलेली तिहेरी तलाकची प्रथा घटनाबाह्य असून मुस्लिम महिलांच्या अधिकारांचं उल्लंघन करणारी आहे,' असा महत्त्वपूर्ण निर्णय अलाहाबाद हायकोर्टाने दिला होता. 'कोणताही पर्सनल लॉ बोर्ड घटनेपेक्षा मोठा नाही,' असंही कोर्टानं यावेळी सुनावलं होतं.

दरम्यान, तिहेरी तलाकचं समर्थन करणाऱ्या ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं अलाहाबाद हायकोर्टाच्या या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे.

मुस्लिमांनीच पुढे येऊन 'तीन तलाक' प्रथा संपवावी -पंतप्रधान मोदी

तीन वेळा तलाक म्हणून घटस्फोट मंजूर करणारी मुस्लिम समाजातील प्रथा ही मुस्लिम समाजातील सुशिक्षित लोकांनी एकत्र येऊन संपवली पाहिजे असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. तसंच ट्रिपल तलाकच्या मुद्द्याला राजकारणाशी जोडू नये असंही मोदी म्हणाले.

दिल्लीतील विज्ञान भवनात थोर समाजसुधारक गुरू बसव जयंती निमित्ताने कार्यक्रम पार पडला यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ट्रिपल तलाकवर आपली भूमिका मांडली. ट्रिपल तलाक हा राजकीय मुद्दा नाहीये. तर मुस्लिम महिलांची ही हक्काची लढाई आहे. यासाठी मुस्लिम महिला स्वत:हुन समोर येत आहे. प्रत्येक मुस्लिम महिलांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे असंही मोदी म्हणाले.

First published:

Tags: BJP, Narendra modi, Supreme Court of India