अमावस्येची रात्र...गडद अंधार! स्मशानभूमीत पेटणाऱ्या चितेजवळ गेली ठाणेकरांची सहल

अमावस्येची रात्र...गडद अंधार! स्मशानभूमीत पेटणाऱ्या चितेजवळ गेली ठाणेकरांची सहल

अमावस्येची रात्री, गडद अंधार, स्मशानभूमीत चटचट आवाज करत पेटणारी चिता आणि त्या चितेच्या भोवती भुताची प्रतिक्षा करणारे 5-25 तरुण...

  • Share this:

ठाणे, 25 जानेवारी : भूत म्हटलं की सगळेजण घाबरतात. अनेकांचा तर भूत प्रेतांवर विश्वास आहे. पण खरंच भूत असतं का हे पाहण्यासाठी ठाणेकरांनी अवघी रात्र थेट स्मशानभूमित घालवली. लहान मुलं, महिला आणि तमाम ठाणेकर भूत पाहण्यासाठी सहलीला गेले होते. रात्रीच्या त्या किर्र अंधारात शाळेच्या मुलांनी भुताला शोधण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे.

अमावस्येची रात्री, गडद अंधार, स्मशानभूमीत चटचट आवाज करत पेटणारी चिता आणि त्या चितेच्या भोवती भुताची प्रतिक्षा करणारे 5-25 तरुण... हे वाचल्यानंतर तुम्ही घाबरला असाल. पहाटेपर्यंत भुतांची वाट पाहिली, परंतु भूत काही आलेच नाहीत. पहाट होताच चितेची आग विझली. पण भूतोबाचा काहीच पत्ता नाही. यामुळे की काय, भुताची भीतीही निघून गेली आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आणखी एक प्रयोग यशस्वी झाला.

मनातील भुताची भीती घालवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे शाखेच्या वतीने दरवर्षी स्मशान सहलीचे आयोजन केले जाते.  “चला भुताला भेटायला” या सहलीला भूताची भेट घ्यायला ठाणेकर तरुणांसह लहान मुलं आणि महिलांनी एकच गर्दी केली होती. भुताची भीती का वाटते? भूत भेटल्याच्या, झपाटय़ाच्या कथा कशा पसरतात? अशा अनेक शंकांचे निरसन यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने करण्यात आलं.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्हा समन्वयक वंदना शिंदे या दरवर्षी पुढाकार घेऊन चला भूताला भेटायला सहलीचे आयोजन करतात. कुठेही भूत नसतो, भुताचे भास होत असतात. काही वेळेला इतरांचे लक्ष्य आपल्याकडे केंद्रित करून घेण्यासाठी भूत लागल्याचा देखावा निर्माण केला जातो. तर कधी-कधी मानसिक आजारामुळेही संतुलन बिघडते. तेव्हा भुताने झपाटले आहे असे बोलले जाते.

अशा वेळी बुवा-बाबांकडे न जाता वैद्यकीय उपचार केले जावेत, असा संदेश या माध्यमातून देण्यात येतो. यंदा ठाण्याच्या कोलशेत भागातील तरीचा पाडा स्नशानभूमीत या सहलीचे आयोजन केले गेले होते.

या सहलीत तीन वर्षाच्या मुलांपासून ते 85 वर्षांच्या वृद्धापर्यंत सर्व लोक सहभागी झाले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे यांनी यावेळेस भोंदू बाबांची हातचलाखी कशी ओळखायची आणि यापासून स्वत:चे आणि इतरांचे कसे सरंक्षण करायचे याचे प्रशिक्षण दिले. ज्यामुळे खरंच भूत असतो का याबाबत ठाणेकरांच्या शंकांचे निरसन झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 25, 2020 09:20 AM IST

ताज्या बातम्या