बडोदा, 04 मार्च : प्रताप नगर आणि दाभोई या बडोदा इथल्या रेल्वेमार्गावर बोगी आगीनं पेटली होती. धगधगत होती. सगळे जण शांतपणे ते पाहत होते. कारण सुरू होतं शूटिंग. ही जळणारी बोगी म्हणजे साबरमती एक्सप्रेसची 27 फेब्रुवारी 2002चीआठवण. त्यावेळी s6 या बोगीत अयोध्येहून परतणारे 59 प्रवासी होते. त्यात बरेचसे कारसेवक होते. ती बोगी पेटवली आणि तिथून गुजरात दंगलीची सुरुवात झाली होती. तेच दृश्य पुन्हा उभं केलं.
इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वे आणि बडोदा अग्निशमन दल यांनी ही फिल्म शूट करायची परवानगी दिली. ही फिल्म बनतेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर. याच वर्षी ती निवडणुकीच्या दरम्यान सोशल मीडियावर रिलीज केली जाईल.
पश्चिम रेल्वेचे पीआरओ खेमराज मीना म्हणाले, डाॅक्युमेंट्री शूट करायची परवानगी दिली होती. विश्वमित्री रेल्वे स्टेशनवर हे शूट झालं. त्यामुळे रेल्वे ट्रॅफिकवर काही परिणाम झाला नाही. ती बोगी आम्ही दिली. पण ती माॅक ड्रिलची बोगी होती आणि वापरात नव्हती.
जयराज गढवी गुजरातमध्ये सुरू असलेलं हे शूट सुपरवाईझ करतायत. बडोदा महानगरपालिकेचं फायर टेंडरवर त्यांनी स्वाक्षरी केली. ते म्हणाले, 'ही बायोपिक डाक्युमेंट्री आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरची आहे.रेल्वेनं आम्हाला शूट करायला कोच दिला. या बोगीच्या आतलं मुंबईत शूट होणार आहे.'
जेव्हा इंडियन एक्सप्रेसनं बडोद्याचे भाजप नेते रंजन भट्ट यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा ते म्हणाले, त्यांना काही माहीत नाही. अशा प्रकारचा माहितीपट बनतोय याची त्यांना काहीच कल्पना नाही.
पश्चिम रेल्वेचे CPRO रवींद्र भाटकर इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले, ' फिल्मच्या स्क्रीप्टमध्ये गोध्रा शब्द नाही. मला जेवढं माहीत आहे की शूटिंगमध्ये पंतप्रधान रेल्वे स्टेशनवर चहा विकतायत, असंच होतं. आम्ही रेल्वे आणि देशाच्या प्रतिमेला धक्का लागेल, असं काही शूट करायची परवानगी देणार नाही. त्यांनी बोगीला आग लावली असेल, तर त्यांचं डिपाॅझिट रद्द केलं जाईल.