राजकारण ते पाऊस, आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या 10 बातम्या

राजकारण ते पाऊस, आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या 10 बातम्या

राज्यातील राजकारणापासून ते पावसाचे सगळे अपडेट्स एका क्लिकवर...

  • Share this:

- आज कर्नाटक राज्याचा राज्योत्सव साजरा होत असताना सीमाभागात मात्र सीमावासीय कडकडीत काळा दिन पाळणार आहेत. सकाळी सीमावासीय बेळगाव शहरातून मूक रॅली काढणार असून या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र, ही रॅली काढण्यावर सीमावासीय ठाम आहेत.

- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी गुरूवारी पक्षाच्या बड्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अजित पवार आणि धनंजय मुंडे उपस्थित होते. राज्यातली दुष्काळाची परिस्थिती आणि सध्याची राजकीय परिस्थिती यावर चर्चा झाली. विशेष म्हणजे संजय राऊतांनी पवारांची भेट घेतली, त्यामुळे राष्ट्रवादीच्या या बैठकीला महत्व प्राप्त झालं आहे.  शिवसेना नेते संजय राऊतांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे. पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी ही भेट घेण्यात आली. दोघांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

- भाजप-सेना सत्तास्थापनेबाबत मनोहर जोशींनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सत्तास्थापनेबाबत मुख्यमंत्र्यांशी उद्धव ठाकरेंची चर्चा झाल्याची माहिती जोशींनी दिली. चर्चेत कोण होतं हे माहित नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

- शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव गटनेतेपदी सुचवलं. त्याला सर्व आमदारांनी अनुमोदन दिलं आहे. शिवसेना भवनात सर्व आमदारांची बैठक पार पडली.

- सत्तास्थापनेसाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नसल्याची भूमिका काँग्रेस नेत्यांनी व्यक्त घेतली आहे. तशी माहिती काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली.

अवकाळी पाउस, अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या पीकहानीचा आढावा घेण्यासाठी राज्यात लवकरच केंद्रीय पथक पाठवणार असल्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलं आहे. राज्यपालांनी गुरुवारी संध्याकाळी अमित शाह यांना फोन करून राज्यात अलीकडेच अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकहानीबद्दल माहीती दिली. त्यावेळी अमित शहांनी केंद्रीय पथक पाठवण्याचे आश्वासन दिले.

- दौंडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्याने पाऊसामुळे लोकांचे हाल झाले असून दौंड तालुक्यातील शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. अवेळी होत असलेला पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे झाडे पडल्याची घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. दौंडमधील दौंड- कुरकुंभ रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. कुरकुंभ मोरीजवळ पाणी साचल्याने मोरीला तळ्याचे स्वरूप आले होते.

- क्यार चक्रीवादळ आणि सततचा पाउस यामुळे कोकणातल्या भातशेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. पंचनाम्यांसाठी आम्ही आणखी किती दिवस वाट पाहायची ? असा सवाल शेतकऱ्यांनी विचारला आहे. तोपर्यंत 10-20 टक्के भात जे मिळेल तेही हातातलं जाईल म्हणून सरकारने आम्हाला तातडीने सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सिंधुदुर्गातल्या भात उत्पादक शेतकऱ्यानी केली.

- मुंबई महापालिका आयुक्तांनी रस्त्यांसाठी नवी योजना आणली आहे. आता म्हणे रस्त्यावरचा खड्डा दाखवा आणि हा खड्डा 24 तासात भरला गेला नाही तर 500 रुपये मिळवा अशी ही योजना आहे. पाऊस थांबलाय. त्यामुळे आता ही योजना राबवली जाणार आहे. त्यासाठी तो रस्ता मुंबई महापालिकेकडे असावा आणि त्याची लांबी किमान एक फूट आणि खोली किमान तीन इंच इतकी असावी असं या योजनेत सांगितलं आहे. पालिकेच्या योजनेवर विरोधकांनी सडकून टीका केली आहे.

- पीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा देणारी बातमी. कारण पोलीस आणि ईडीनं एचडीआयएल कंपनी आणि वाधवान यांची तब्बल साडे तीन हजार कोटींची संपत्ती जप्त केली. ही संपत्ती लिलावात काढून खातेधारकांची बँकेत अडकेलेल्या पैशांची परतफेड़ केली जाईल अशी माहिती आहे. वाधवान यांच्या 'हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड म्हणजेच HDIL कंपनीने पीएमसी बँकेतून 2 हजार 200 कोटींचं कर्ज घेतलं होतं.

- मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना दिलेली वाढीव मुदत येत्या 21 नोव्हेंबरला संपणार आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात महापौर पदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ  संपला. मात्र. विधानसभा निवडणुकीमुळे महापौरांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती.

First published: November 1, 2019, 7:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading