Home /News /news /

उद्धव ठाकरे आणि अजितदादांना हीच ती संधी, फडणवीसांचा सणसणीत टोला

उद्धव ठाकरे आणि अजितदादांना हीच ती संधी, फडणवीसांचा सणसणीत टोला

' राज्य सरकारने जर पदरचा पैसा खर्च केला तर तो पैसा परत मिळणार आहे. पण हात झटकण्यात तिन्ही पक्ष तरबेज आहे'

    उस्मानाबाद, 20 ऑक्टोबर :  अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावरून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांचा शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीचा व्हिडीओ दाखवून आता हीच संधी आहे, अशी आठवणच फडणवीसांनी करून दिली आहे. उस्मानाबाद इथं झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्टाइलची कॉपी करत लाव रे तो व्हिडीओ प्रयोग केला आहे. यावेळी सत्तेत येण्याआधी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय मागणी केली होती, त्याबद्दलचा जुना व्हिडीओ दाखवला आहे. या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी कोरडवाहु शेतीसाठी हेक्टरी 25 हजार रुपये आणि बागायतीसाठी 50 हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी केली होती. त्यांचा हा व्हिडीओ दाखवून आता तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहात, तुम्ही जी वारंवार मागणी करत होता, आता ती पूर्ण करण्याची हीच संधी आहे, असा सणसणीत टोला फडणवीस यांनी लगावला. 'राज्यात काही संकट आले की, नेहमी केंद्राकडेच बोट दाखवण्याचा प्रकार सुरू आहे. पण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच फोन करून मुख्यमंत्र्यांकडून माहिती जाणून घेऊन मदतीचे आश्वासन दिले. केंद्र सरकारची मदत कधी येते हे शरद पवार यांना माहिती आहे. केंद्राच्या समितीचे प्रमुख हे गृहमंत्री, अर्थमंत्री असतात. केंद्राकडून एनडीआरएफसाठी निधी दिला असतो, त्याचा वापर करता येतो. त्यामुळे राज्य सरकारने कारणे न दाखवता तातडीने मदत केली पाहिजे, अशी मागणीही फडणवीसांनी केली. 'शरद पवारांनी आवश्यकता असेल तर कर्ज काढलं पाहिजे असा चांगला सल्ला दिला आहे. कर्ज काढणे हे काही पाप नाही. आपले जे बजेट आहे. त्यातील 70 ते 80 टक्के रक्कम कर्जातून येते. आपल्याला 1 लाख 20 हजार कोटींचं कर्ज काढता येते. आतापर्यंत 60 हजार कर्ज घेण्यात आले आहे. त्यामुळे कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करता येईल', असंही फडणवीस यांनी सांगितले. तसंच, राज्याला जसा जीएसटी येतो तसा जीएसटी केंद्रालाही मिळत नाही. मार्चपर्यंतचं अनुदान २० हजार कोटी रुपयांपर्यंत मिळालं आहे.केंद्र सरकार कर्ज काढून राज्यांना जीएसटीचे पैसा देत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने जर पदरचा पैसा खर्च केला तर तो पैसा परत मिळणार आहे.  पण हात झटकण्यात तिन्ही पक्ष तरबेज आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या