उल्हासनगर, 10 जून : मंदिरातून देवी-देवतांच्या मूर्ती आणि अन्य दागिने चोरीला गेल्याची घटना बुधवारी संध्याकाळी उल्हासनगरच्या कॅम्प 4 परिसरात घडली होती. या चोरीचा उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलिसांनी अवघ्या 4 तासांत छडा लावत देवी-देवतांच्या सर्व मूर्ती आणि दागिने हस्तगत केले आहेत. मंदिरात चोरी झाल्याची माहिती मिळताच अनेक भाविकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.
उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरातील कालिका माता मंदिराच्या मागे जय अंबे मंदिर आहे. या मंदिराचे मालक दीपक शादीजा हे बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास मंदिर बंद करून घरी गेले. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता परत आल्यानंतर त्यांना मंदिरातून देवी-देवतांच्या मूर्ती आणि अन्य दागिने चोरीला गेल्याचं निदर्शनास आलं. मंदिरातून घरी जाताना त्यांनी मंदिराचा मुख्य दरवाजा तर बंद केला होता. मात्र बाजूचा एक छोटा दरवाजा फक्त ओढून घेत ते घरी गेले होते. मात्र दुपारच्या सुमारास कचरा वेचणारी 3 लहान मुलं मंदिरात आली आणि त्यांनी मंदिरातील देवी-देवतांच्या मूर्ती आणि अन्य दागिने असा जवळपास सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेला.
हे ही वाचा-पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज आकारणी
यानंतर त्यांनी परिसरातीलच एका भंगार विक्रेत्याला हा सर्व मुद्देमाल विकला. संध्याकाळी मंदिरात चोरी झाल्याची बाब उघड होताच दीपक शादीजा यांनी विठ्ठलवाडी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. मात्र पोलिसांनी काही तासातच मंदिरात चोरी करणार्या तीन लहान मुलांना शोधून काढलं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भंगार विक्रेता शकील दोस्त मोहम्मद अहमद याच्या घरी जाऊन पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे मंदिरातून चोरलेला सगळा मुद्देमाल आढळून आला. हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेत पोलिसांनी या भंगार विक्रेत्यालाही अटक केली आणि अवघ्या चारच तासात या संपूर्ण चोरीचा छडा लावला. मंदिरात चोरी करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठविण्यात आलं असून भंगार विक्रेत्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Ulhasnagar