मुंबई, 16 मार्च : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा (Mansukh Hiren Case) तपास NIAकडून गेल्यानंतर या प्रकरणी अनेक घडामोडी होताना दिसत आहेत. याच प्रकरणात एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक करण्यात आली. त्यानंतर वाझे यांचं घर, ऑफिस, गाडी अशा विविध गोष्टींचा तपास करण्यात येत आहे. अशातच सचिन वाझे हे वापरत असलेल्या एका महागड्या गाडीच्या झडतीनंतर एनआयएने धक्कादायक खुलासा केला आहे.
सचिन वाझे हे वापरत असलेल्या महागड्या गाडीत चक्क नोटा मोजण्याची मशीन सापडली आहे. तसंच या गाडीत 5 लाख रुपयेही आढळून आले आहेत. वाझेंच्या गाडीत पैसे मोजण्याचं मशीन का ठेवण्यात आलं होतं, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
NIAकडून वेगवान तपास, अनेक महत्त्वाचे खुलासे
दक्षिण मुंबईतील कार माइकल रोडवर सापडेलल्या गाडीयाप्रकरणी एनआयएने मुंबई क्राईम ब्रँच या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर याप्रकरणी तपासाला गती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी म्हणजेच 15 मार्चच्या रात्री आठच्या सुमारास NIA ची दोन पथकं मुंबई पोलीस आयुक्तालयातील नवीन इमारतीत चौथ्या माळ्यावर असलेले क्राईम इंटेलिजन्स युनिटचे कार्यालय जिथे सचिन वाझे बसायचे या कार्यालयाची पूर्ण झाडाझडती घेऊन त्या कार्यालयातून सचिन वाझे यांचा मोबाईल लॅपटॉप टॅब आणि स्फोटकांनी भरलेल्या हिरव्या गाडी संदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
ज्यावेळेस स्फोटकांनी भरलेली हिरव्या गाडीचा तपास सचिन वाझे यांच्याकडे होता. त्यावेळेस त्यांनी तपासात बरीच गडबड केल्याचा संशय एनआयएला आहे.
या सर्व गोष्टी सचिन वाझे यांनी मुंबई क्राईम ब्रांचच्या सर्व वरिष्ठ अधिकार्यांपासून लपवून ठेवल्या होत्या.
दरम्यान, 5 मार्चला मनसुख मिश्रीलाल हिरेन यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडल्यानंतर हिरेन परिवाराकडून थेट सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. यानंतर दुसऱ्या दिवशी सचिन वाझे यांना वरिष्ठांनी बोलावून या आरोपांबाबत विचारणा केली असता त्याही वेळी सचिन वाजे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. सोबतच पुन्हा एकदा आपण मनसुख मिश्रीलाल हिरेन याला ओळखत नसल्याचं सांगितलं.
या गोष्टीवरून एक मुद्दा स्पष्ट होतो तो म्हणजे हिरव्या रंगाची स्फोटकांनी भरलेली गाडी मुंबईतल्या दक्षिण मुंबई येथे पार्क करण्यात आली आणि या प्रकरणात ज्या काही घडामोडी घडल्या, जे काही लपवलं, याबाबत अतिशय कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र आता या सचिन वाझे यांच्या प्रकरणाची मूळे नेमकी कुठपर्यंत आहेत, हे आगामी काळातच स्पष्ट होतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai, Sachin vaze