आईनेच मुलगी समजून अर्भक फेकून दिलं, मात्र निघाला मुलगा; धक्कादायक घटना उघड

आईनेच मुलगी समजून अर्भक फेकून दिलं, मात्र निघाला मुलगा; धक्कादायक घटना उघड

या प्रकरणी शिऊर पोलिसांत दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

सचिन जिरे, औरंगाबाद, 2 ऑक्टोबर : पाच मुलींच्या पाठीवर पुन्हा सहावी मुलगीच झाल्याचा संशय आल्याने जन्मदात्या आईनेच अवघ्या चार तासांचे अर्भक झुडुपात फेकले. मात्र, हे अर्भक मुलगी नसून मुलगा असल्याचे समोर येताच 'ते' आमचेच असल्याचा दावा या दाम्पत्याने केला. ही घटना वैजापूर तालुक्यातील टुनकी गावात घडली. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी अर्भकासह दावा करणाऱ्या माता, पित्यास औरंगाबादला डी.एन.ए चाचणीसाठी पाठवलं आहे. तसंच या प्रकरणी शिऊर पोलिसांत दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैजापूर तालुक्यातील टुनकी शिवारातील गट क्रमांक 110 मध्ये बुधवारी सकाळीच अवघ्या चार तासांचे पुरुष जातीचे अर्भक सापडले. यासंबंधी पोलीस पाटील रावण निकम यांनी सदरील घटनेची माहिती शिऊर पोलिसांत कळवली. त्यांनी त्या अर्भकाला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात तातडीने पाठवले. मात्र, पुरुष जातीचे अर्भक सापडले, अशी चर्चा गावात होताच, गावातील सुनीता अशोक साळुंके व अशोक चंद्रभान साळुंके यांनी दावा करीत आम्हीच हे अर्भक फेकले असल्याची कबुली पोलिसांना दिली.

सुनीता साळुंके यांना अगोदरच पाच मुली होत्या. सहावीसुद्धा मुलगीच झाली, असा संशय आल्याने त्यांनी स्वत: बुधवारी पहाटे अवघ्या काही तासांचे अर्भक परिसरातील शेतात फेकले होते. सकाळी गावात पुरुष जातीचे अर्भक सापडल्याने खळबळ उडाली. ही चर्चा साळुंके कुटुंबियांपर्यंत पोहोचताच त्यांनी अर्भकाकडे धाव घेत, ते आमचेच असल्याचे पोलिसांना सांगितले.

आम्हीच हे अर्भक फेकले असल्याचे साळुंके कुटुंबियांनी मान्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा उलगडा व्हावा, तसेच सापडलेले अर्भक खरंच साळुंके कुटुंबियाचेच आहे का याचा शोध घेण्यासाठी त्यांना औरंगाबादला डी.एन.ए. चाचणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती साह्ययक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी दिली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 2, 2020, 7:13 PM IST
Tags: aurangabad

ताज्या बातम्या