मदुराई- हल्ली नाश्ता प्लॅस्टिकमध्ये मिळतो तर ऑफिसमध्ये जाताना जेवणाचा डबा ही प्लॅस्टिकचाच असतो. चपाती बांधणं असो की कपडे बांधणं सगळ्या गोष्टींसाठी प्लॅस्टिकचाच वापर केला जातो. प्लॅस्टिकवर आपण एवढे अवलंबून आहोत की याशिवाय आपण जगण्याचा विचारच करू शकत नाहीत. नेमकी हीच आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. जमिनीवरचे जीव असो किंवा समुद्रातील जीव सगळ्यांनाच प्लॅस्टिकचा त्रास सहन करावा लागत आहे. याच मुख्य कारण म्हणजे प्लॅस्टिकला नष्ट करता येऊ शकत नाही. यामुळेच त्याची विल्हेवाट लावता येत नाही.
आपण प्लॅस्टिक बंदी करुन यावर तात्पुरतं बंधन घालू शकतो. मात्र अजूनही महाराष्ट्राच्या अनेक भागात प्लॅस्टिकचा वापर सर्रास केला जातो. यावर उपाय विचारला असता अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने आपले विचार मांडतात. पण भारतातल्या एका व्यक्तीने त्याचे प्लॅस्टिग बंदीचे विचार सत्यात उतरवले आहेत.
तमिळनाडुच्या मदुराई येथे राहणारे डॉ. राजगोपालन वासुदेवन यांनी अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली आहे. राजगोपालन यांनी टाकाऊ प्लॅस्टिकपासून प्रदुषणमुक्त रस्ते बनवले आहेत. मदुराईमध्ये डॉ. राजगोपालन वासुदेवन यांना ‘प्लॅस्टिक मॅन’ नावाने ओळखलं जातं.
२००१ मध्ये त्यागराजन विद्यापिठात केमिस्ट्री डिपार्टमेंटचे डॉ. राजगोपालन डीन आणि शिक्षक होते. त्यांनी विद्यापीठाच्या लॅबमध्येच प्लॅस्टिकपासून रस्ते बनवण्याचा पहिला प्रयोग केला. या प्रयोगात त्यांना बिट्युमन आणि प्लॅस्टिकमुळे रस्ते अधिक पक्के होतात असं कळलं. एक किलोमीटरचा एक पदरी रस्ता बनवण्यासाठी सर्वसाधारणपणे १० टन बिट्युमन लागतं. मात्र प्लॅस्टिक मॅन रस्ता बनवण्यासाठी ९ टन बिट्युमन आणि १ टन प्लॅस्टिकचा वापर करतात. १ टन प्लॅस्टिक म्हणजे साधारणपणे १० लाख कॅरी बॅग.
प्लॅस्टिक नष्ट व्हायला १ हजार वर्षांचा काळ लागतो. मात्र टाकाऊ प्लॅस्टिकपासून रस्ते तयार केले तर ते पर्यावरणाच्याही हिताचे आहे.
प्लॅस्टिकच्या रस्त्यांचे फायदे-
हे रस्ते जड वाहनांचा लोड घेऊ शकतात.
या रस्त्यांमध्ये पाणी साचत नाही. त्यामुळे पोटहोल्सच्या समस्या निर्माण होणार नाहीत.
किमान १० वर्षांपर्यंत या रस्त्यांना कोणताही मेटेनन्स लागणार नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्लॅस्टिक डिस्पोज करण्याचा हा सर्वोत्कृष्ट मार्ग आहे.
राजगोपालन वासुदेवन यांनी युनिव्हर्सिटीच्या नावावर या प्रयोगाचे पेटंटही घेतले आहेत. राजगोपालन यांनी हे संशोधन भारतीय सरकारला मोफत दिलं आहे.
२००२ पासून प्लॅस्टिक रोड बनवायला सुरुवात झाली आहे. याची पहिली सुरुवात तमिळनाडुमध्ये झाली. त्यानंतर केरळा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गोवा यांसारख्या ११ राज्यांमध्ये प्लॅस्टिकचा वापर करण्यात आलेले रस्ते बनवले गेले. आतापर्यंत डॉक्टरांच्या देखरेखीखाली १ लाख किमीचे प्लॅस्टिकचा वापर करुन रस्ते बनवण्यात आले आहेत.