शिर्डी, 22 ऑगस्ट: भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते प्रवरा सहकारी साखर कारखान्यात श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. यावेळी विखे पाटलांनी सपत्निक पूजा केली. खासदार डॉ. सुजय विखे पाटीलही उपस्थित होते. यावेळी साईमंदिर खुले करण्याची विखे पिता-पुत्रांनी मागणी केली.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, 'राज्य सरकारने मॉल उघडले, इतर व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली. पण मंदिरं बंद ठेवणं उचित नाही. राज्य सरकारनं राज्यातील सर्वच मंदिरं आता खुली करावी. सुरक्षा उपाययोजना करा, मात्र मंदिरे खुली करा. मंदिरं सुरू झाल्यानं परिसरातील रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालणा मिळेल', असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं.
शिर्डीचं अर्थकारण साई मंदिरावर अवलंबून...
शिर्डीचं सर्व अर्थकारण साई मंदिरावर अवलंबून आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार देशातील तिरूपती, वैष्णोदेवी मंदिर सुरू झाले. मात्र शिर्डीचं साई मंदिर अजूनही बंदच आहे. शिर्डी संस्थान आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. ऑनलाइन दर्शन सुविधा असल्याने मंदिर सुरू करणे सोयिस्कर आहे. गर्दी न होता ठराविक संख्येने मंदिर सुरू होवू शकते. साई मंदिर सुरू करण्यासाठी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे. ही मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचाही इशारा खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिला आहे.