दापोली, 11 मे : कोरोना व्हायरसचे संकट आणि त्यामुळे लागू झालेल्या लॉकडाउनमुळे मजुरांचे प्रचंड हाल झाले आहे. हजारो किलोमीटर पायपीट करून मजूर आपल्या गावाकडे निघाले आहे. बिकट अशा परिस्थितीत माणुसकी अजूनही जिवंत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत खाकी वर्दीतील माणसाची माणुसकी पाहायला मिळाली. मुस्लीम समाजातील महिलांना रोजे सोडण्यासाठी आपल्या जेवणाचे डबे देऊन दापोली पोलीस कर्मचारी निलिमा देशमुख यांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील काही मुस्लीम कामगार आपल्या गावी जाण्यासाठी सकाळपासून बस स्थानकात येऊन बसले होते. मात्र, दिवसभर बस काही सुटली नाही. सायंकाळी 7 वाजता अजान झाली आणि रोजे सोडण्याची वेळ आली पण पदरात कलिंगडाच्या फोडी शिवाय काहीही नसल्याने, आपला उपवास सोडण्यासाठी त्या महिला कलिंगडाच्या फोडी घेऊन खाण्यासाठी बसल्या.
हेही वाचा -राज्याच्या राजकारणाने घेतले नवे वळण,महाविकास आघाडी आणि भाजपसमोर असेल आव्हानं
तितक्यात दापोली बस स्थानकात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी निलिमा देशमुख यांच्या लक्षात आले आणि त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांना याबद्दल सांगितलं. त्यानंतर काही क्षणात पोलीस स्टेशनमधील इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या जेवणाचे डबे घेऊन बस स्थानकात पोहोचले.
निलिमा देशमुख आणि इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या जेवणाचे डबे हे या महिलांमध्ये वाटून दिले. रोजे करणाऱ्या या महिलांनाही पोलिसांच्या या मदतीमुळे आधार मिळाला. मोठ्या मनाने त्याचा स्वीकार करून या महिलांनी आपले रोजे सोडले.
सोलापूर जिल्ह्यातील या बिराड कामगार महिला आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. सकाळी 11 वाजता एसटी बस मिळणार म्हणून जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या झोपड्या उद्ध्वस्त करून गावाकडे निघाले होते. मात्र, त्यांच्याकडे कोणतीही शिदोरी नव्हती. परंतु, एसटी महामंडळाच्या दिरंगाईमुळे बस दिवसभर सुटलीच नाही.
हेही वाचा -नाशिकजवळ भीषण अपघात! मजुरांना घेऊन जाणारा ट्रक आणि कारची धडक, 15 गंभीर
शेवटी सायंकाळी सात वाजता रोजे सोडण्याची वेळ झाली आणि त्यांच्याकडे केवळ कलिंगडाच्या फोडी शिवाय काही नव्हते. त्यावरच रोजे सोडून आपले पोट भरणार होते. पण कर्तृव्यावर असलेल्या निलिमा देशमुख यांनी आपले डबे देऊन रोजा सोडण्यास मदत केली. यावेळी माय कोकणचे कॅमेरामन फैसल काझी यांनी सुद्धा त्या महिलांना बिस्कीट आणि पाणी देऊन माणुसकीचा धर्म पाळला.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.