मुंबई, 26 जुलै : राज्यातील बंद पडलेल्या सहकारी सूत गिरण्या पुन्हा सुरू होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. बंद पडलेल्या सहकारी सूत गिरण्यांची विक्री न करता त्या पुन्हा सुरू करण्याचा वस्त्रोद्योग विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात सरकार यावर मोहोर उठवणार असल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे तब्बल दीड लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे.
राज्यात सध्या 165 सहकारी सूत गिरण्या आहेत. यातील बहुतांश गिरण्या विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात आहे. मात्र अनेक कारणास्तव आतापर्यंत 93 सूत गिरण्या बंद पडल्या आहेत. तर 72 कशाबशा सुरू आहेत. राज्यातील या सूत गिरण्यांना सरकारने लाखो रुपयांचं भांडवल दिलं आहे.
सूत गिरण्या पुन्हा सुरू झाल्यामुळे बेरोजगारांना रोजगार मिळेल. याशिवाय शेतकऱ्यांच्या कापसाला अधिकचा भाव, उद्योगवाढ आणि आदी गोष्टींसाठी बंद गिरण्या पुन्हा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती या विभागाने प्रधान सचिव पराग जैन यांनी दिली.
राज्यात गिरण्या बंद पडल्या तरी आजही महाराष्ट्र कापडनिर्मितीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या राज्यात 22 लाख पॉवरलूम आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या तामिळनाडूमध्ये 7 लाख पॉवरलून आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News